मुंबई 15 एप्रिल**:** मंदिरा बेदी ही एक नामांकित सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. तिनं मालिका, चित्रपट, मॉडलिंग इतकंच नाही तर अगदी क्रिकेट समालोचन देखील केलं आहे. ही अभिनेत्री आज पन्नाशीत आली आहे. मात्र तरी देखील तिचा उत्साह आणि सौंदर्य टीचभर देखील कमी झालेलं नाही. ती सतत काहीना काही नवीन काही तरी शिकत असते. विषेश म्हणजे मंदिराचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया मंदिराचा हा थक्क करणारा प्रवास. तिनं कशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात इतकं प्रचंड यश मिळवलं. 1994 मध्ये दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या शांती या टीव्ही मालिकेतून (TV serial Shanti) मंदिरानी तिच्या करिअरला सुरुवात केली. भारतीय टीव्हीवरची दीर्घकाळ चाललेली मालिका असा शांतीचा उल्लेख केला जातो. यात मुख्य व्यक्तिरेखा शांती हीच भूमिका मंदिरानी साकारली होती. शांत, संयमी, सालस मुलीची भूमिका तिने उत्तम वठवली. त्या केबलच्या जमान्यात महिलाप्रधान मालिकांचा पाया शांती या मालिकेने रचला. मंदिराने लावलेली काळ्या रंगाची उभी बाणासारखी टिकली त्या काळी फॅशन झाली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगा हिट दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटासह अनेक चित्रपटांत मंदिराने भूमिका केल्या. टीव्हीवरील आहट, औरत, घर जमाई, क्यूँकि सास भी कभी बहू थी अशा मालिकांमध्ये तिने काम केलं. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ती मॉडर्न लूक आणि पारंपरिक साडीमध्येही खूप सुंदर दिसते. अवश्य पाहा - नागा साधुंवर टीका करणं अभिनेत्याला पडलं भारी; मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या क्रिकेटची आवड असलेल्या मंदिरानी क्रिकेटमधील बारकावे सांगण्यासाठी क्रिकेट मैदानावर पदार्पण केलं तेंव्हा तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. टीव्ही प्रेझेंटर (TV presenter) म्हणून साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज या लूकमध्ये मंदिराला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी आपण लग्नानंतर 12 वर्षांनी मुलाला जन्म दिल्याचं मंदिरानी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्या मुलाखतीत मंदिरा म्हणाली, ‘मी 39 वर्षांची होते तेव्हा मी मुलाला जन्म दिला. मला भीती होती की मी गरोदर राहीले तर माझं करिअर संपुष्टात येईल.’ गेल्यावर्षी जुलै महिन्यात मंदिरानी 4 वर्षांच्या तारा या मुलीला दत्तक घेतलं आहे. मंदिर कायमच तिच्या फिटनेसची काळजी (Fitness Conscious) घेते आणि प्रचंड कष्ट घेते. मंदिरा वेब सीरिजच्या दुनियेतही लवकरच दिसणार आहे. मंदिरा बेदीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.