मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

BLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल!

BLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल!

राज ठाकरे यांच्या सभांमुळे मतांमध्ये 'परिवर्तन' होईल आणि आघाडीला फायदा होईल अशी शक्यता बांधली जात होती. तसं खुद्द आघाडीच्या नेत्यांनीच जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं. परंतु..

राज ठाकरे यांच्या सभांमुळे मतांमध्ये 'परिवर्तन' होईल आणि आघाडीला फायदा होईल अशी शक्यता बांधली जात होती. तसं खुद्द आघाडीच्या नेत्यांनीच जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं. परंतु..

राज ठाकरे यांच्या सभांमुळे मतांमध्ये 'परिवर्तन' होईल आणि आघाडीला फायदा होईल अशी शक्यता बांधली जात होती. तसं खुद्द आघाडीच्या नेत्यांनीच जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं. परंतु..

'मनसेचे उमेदवार असते तर थोडा फरक पडला असता' लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं हे विधान खूप काही सांगून जातं. मुळात विरोधकांना जसा अपेक्षित निकाल होता त्याच्या उलट लोकसभेचा निकाल लागला. त्यामुळे कोण चुकलं, काय चुकलं याचं कारण शोधून काढणे हे विरोधकांनाही पचणी पडणे हे पार कठीण होऊन बसले आहे.

राज ठाकरेंनी तर हा निकाल अनाकलनिय होता, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आणि ती साहजिकच होती. ज्या प्रकारे भाजपच्या धोरणाविरोधात वातावरण निर्माण झाले होते, त्यावरून विरोधकांमध्ये विजयाबद्दल विश्वास निर्माण झाला होता, पण मोदी लाट नाहीतर त्सुनामीत तो पार वाहून गेला.

मुळात राज ठाकरे यांचं काय चुकलं?राज यांनी मोदी-शहा जोडी नको म्हणून प्रचार केला. त्यांनी कुणाला मतदान करावे, असा कोणताही आग्रह धरला नाही. परंतु, त्यांचा अर्थ मात्र, भाजपला मतदान न करता इतर कुणालाही करा, असाच होता. खरं तर कम्युनेक्शनमध्येही पारदर्शकता असणे गरजेचं आहे. त्यामुळे मतदारांनी ज्यांचा त्याचा अर्थ काढून आपला हक्क बजावला. जर मतदारांना मतदान कुणाला करायचे हे जर निश्चित असते तर फरक पडला असता.

वंचित फॅक्टरचा फायदा

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात यंदा जाती-पातीच्या आधारावरच मतदान झालं हे वास्तव आहे. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असाउद्दीन औवेसी यांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जातीची लेबल घेऊन मैदानात उतरली. त्याचा मोठा परिणाम दिसून आला.

पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या वंचितला राज्यात तब्बल ३५ लाखांहुन अधिक मतं मिळाली. जवळपास ११ ठिकाणी वंचितचे उमेदवार हे लाखाने मतं मिळवून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. नांदेड, सोलापूर, बुलडाणा, हातकणंगले, सांगली, यवतमाळ, परभणीमध्ये वंचितच्या उमेदवारींनी दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या स्थानावर जागा बळकावली. औरंगाबादमधून  तर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील सय्यद निवडून आले. त्यांनी सेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा मानहाणीकारक पराभव केला. जलील जरी वंचितच्या चिन्हावर निवडणूक लढले नसले तरी ते वंचितचाच एक भाग होते.

राजना ऐकणारे सर्वच पण..

राज ठाकरे यांच्या सभांमुळे मतांमध्ये 'परिवर्तन' होईल आणि आघाडीला फायदा होईल अशी शक्यता बांधली जात होती. तसं खुद्द आघाडीच्या नेत्यांनीच जाहीरपणे बोलूनही दाखवलं. एवढंच नाहीतर अजित पवार यांनी तरी समविचारी पक्ष म्हणून मनसेनं सोबत यावं अशी इच्छाच बोलून दाखवली होती. नांदेडपासून ते मुंबईपर्यंत राज यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत सभांचा धडका लावून दिला. त्यांच्या सभांमुळे भाजप आणि शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली होती. एवढंच काय परराज्यातूनही त्यांच्या सभांना मागणी होऊ लागली. पण खरी परिस्थिती अशी होती की, राज यांना ऐकणारे सर्वच होते पण मतदान करण्यासाठी असलेले पर्याय हे वेगवेगळे होते. मोदी-शहा नको म्हणून मतदान करताना ते काँग्रेस राष्ट्रवादीचेच उमेदवार असावे, असा कोणताही नियम नव्हता. तिथे वंचितचे उमेदवार, अपक्षही होते. बाळासाहेबांनी तर काँग्रेस नकोच, अशोक चव्हाण तर हिंदुत्त्ववादी संघटनेचे सदस्य आहे, असे आरोपही केले. त्यामुळे बहुजन मतदार हे बाळासाहेबांच्या शब्दापलीकडे गेले नाही. बहुजन मतदान हे भाजपला सुद्धा गेले नाही. परिणामी बहुजन मतं ही एक गठ्ठा वंचितच्याच उमेदवारांना मिळाली तर दुसरीकडे सेना आणि भाजपचे ठरलेले मतदार त्यांच्याच बाजूने ठामपणे उभे राहिले. अर्थाच हिंदुत्वावादी मतदारांमध्ये मराठा, ओबीसी मतदारांनी आपला कौल हा युतीला दिला आणि उरलेला मतदार हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. कित्येक ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार काही फरकाने पराभूत झाले.

मनसेचे उमेदवार असते तर...

आता राज ठाकरे यांचं मनसे फॅक्टर फेल गेलं का? याचं उत्तर हे वंचितच्या यशावरून स्पष्टपणे दिसून येतंय. पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना याची कल्पना जरूर असावी, की जातीपातीच्या मतदानाने किती फरक पडू शकतो. मुळात, पवारांनी मनसेचे उमेदवार असते तर फरक पडला असता असं विधान करून खरी हकीकत सांगून टाकली. चला पवार म्हटल्या प्रमाणे विचार करू की, मनसेचे उमेदवार असते तर मनसेच्या मतदानाचा आणखी गठ्ठा तयार झाला असता. ज्या प्रमाणे मोदी लाटेत भाजपचे उमेदवार विजयी झाले, तसा काही करिष्मा झालाही असता किंवा नसता.  पण याचा फरक नक्कीच वंचित आघाडीवर किंवा जे सेनेचे मतदार आहे आणि ते राज यांना मानतात ते निदान वळते तरी झाले असते.

पुढे काय?

असो, राज यांनी उमेदवार उभे न करता मोदी-शहा विरोधात इंजिन ट्रॅकवर पळवलं खरं. पण, अपेक्षित टप्पा गाठू शकलं नाही. विधानसभेपूर्वी राज यांनी ही मॉक ड्रील होती असं समजून नव्याने विधानसभेची तयारी करावी लागणार आहे. बहुदा त्यांना खूप आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. नवे उमेदवार, राज्यातलं जातीचं समिकरण याचा अभ्यास करून मैदानात उतरावे लागणार आहे.

मुळात भाजप आणि युतीचे पारडे आता इतके जड झाले आहे की,  विरोधकांना विधानसभेचा पेपर नक्कीच अवघड असणार आहे, यात आता शंका नाही.

(या लेखातील व्यक्त झालेले विचार लेखकाचे वैयक्तिक मत असून न्यूज18 लोकमत त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.)

===================================

First published:

Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra