सोलापूर, 30 ऑगस्ट: दक्षिण सोलापूर तालुक्यात काळवीट शिकार केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे काळवीटचं मटन विकताना आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नेचर कॉन्झर्वेशन क्लबच्या सदस्यांनी दिलेल्या गोपनिय माहितीवरून वनविभाग आणि ग्रामीण पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली आहे. विजय भोसले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीनं यापूर्वीही अनेक काळवीट आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं चौकशीत समोर आलं आहे. हेही वाचा… संदीप सिंहवर No Comment! मंदिर उघडणे आणि ई-पासबाबत काय म्हणाले संजय राऊत सोलापुरात काळवीट शिकारप्रकरणी एका अट्टल शिकाऱ्याला वनविभाग आणि ग्रामीण पोलिस दलाने रंगेहाथ अटक केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी येथे हा प्रकार घडला. सोलापुरातील नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला आलेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूर, जिल्हा पोलीस दल आणि वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त कारवाईतून हे काळवीट शिकार प्रकरण उघडकीस आलं आहे. संगदरी येथे काळवीटची शिकार करून त्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला मिळाली. माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस अधिक्षकांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोबत पाठवले. तसेच वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली असता काळवीटाची शिकार झाल्याचे उघड झाले. यावेळी आरोपीच्या घरातून काळवीटचे मांस, चारही पायाचे खूरं, कातड्याचे तुकडे, शिंगे, नायलॉन वायरचे फासे, कुऱ्हाड, सुरा, वागर, वजन काटा असा मुद्देमाल जप्त करून विजय भोसले या आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा… प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर हादरलं प्रशासन, पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त या घटनेमुळे वन्य जीव प्राण्यांच्या शिकारीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वन विभाग आणि पोलिसदल तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.