उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे आणि बजरंग दलाचा त्याला होणारा विरोध हे समीकरण नवीन नाही. पण तरी यंदा बजरंग दलाने व्हेलेंटाईन डेला विरोध करण्याआधी हनुमान चालीसा पाठ करत मारपिटच्या परंपरेला फाटा दिला. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात हनुमान चालीसा पठणाचा ट्रेण्ड झाला आहे. हा ट्रेंड आता व्हेलेंटाईनमध्ये देखील पोहोचला आहे. कारण आज नागपूर शहरात बजरंग दलाने प्रेमाच्या दिवसाला विरोध करण्यासाठी चेतावणी रॅली आयोजित केली. या रॅलीची सुरुवात मात्र मंदिरात हनुमान चालीसा पठण करून करण्यात आली. विशेष म्हणजे दरवर्षी प्रेमी युगुलाला मारहाण करणाऱ्या बजरंगी कार्यकर्त्यांनी यंदा शांततेत रॅली काढून टेडी बिअर पेटवून निषेध व्यक्त केला. दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी नियोजन केल जाते पण ऐनवेळी बजरंग दल यांचा होणारा विरोध प्रदर्शन यामुळे अनेक वेळा प्रेमाच्या दिवसाच्या उत्साहावर विरजण टाकल जायचं. मात्र, यंदा हनुमान ने बजरंगीना सद्बुद्धी दिली आणि प्रेमाचा दिवस उत्साहात साजरा केला. मात्र, प्रेम साजरा करणे ही वैयक्तिक बाब असून त्यात कोणीही ढवळा ढवळ करू नये, अशी भावना तरुणाई व्यक्त करत आहे. हेही वाचा - प्रेमीयुगुलांनी साधला मुहूर्त, जळगावात 12 ते 15 जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला बांधली रेशीमगाठ संकट मोचक हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. आज व्हेलेटाईन डेच्या निमित्याने त्याचा प्रत्यय आज प्रेमी युगुल आणि बजरंगी कार्यकर्त्यांना आला. त्यांनी त्यांची रॅली पूर्ण केली आणि प्रेमी युगलांना बजरंग दलाच्या विरोधाशिवाय प्रेमदेखील व्यक्त करता आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.