नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: एकीकडे देशात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रार्दुभाव कमी होत असताना डेंग्यूनं (Dengue)पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. देशातल्या काही राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. अशातच मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry)तज्ज्ञांची केंद्रीय पथके 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवण्यात आली आहेत. डेंग्यूच्या प्रादुर्भावाशी निगडित सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी हे पथकं काम करतील.
हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या पथकांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि मच्छर-जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी समाविष्ट आहेत. आरोग्य सेवा महासंचालक आणि नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना (आरोग्य) पत्र पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा- लग्नानंतर चौथ्या दिवशीच विवाहितेसोबत झाला घात; सूटकेसमध्ये आढळला मृतदेह
डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त रुग्ण असलेल्या राज्यांची ओळख पटवून तज्ज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला.
या वर्षी आतापर्यंत दिल्लीत डेंग्यूचे 1,530 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली गेली. जी गेल्या चार वर्षांतील या महिन्यातील सर्वाधिक संख्या आहे.
दिल्लीत स्वाईन फ्लूचंही थैमान
कोरोना महामारी आणि डेंग्यूच्या संसर्गादरम्यान आता दिल्लीत स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. 60 दिवसांत संसर्ग 44 पट वाढला आहे. कोरोना महामारी आणि डेंग्यूच्या संसर्गादरम्यान आता दिल्लीकरांसमोर आणखी एक नवीन समस्या उद्भवू शकते. राजधानीतही स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. परिस्थिती अशी आहे की, 60 दिवसांत रुग्णांची संख्या 44 पटीने वाढली असून त्याबाबत सरकारलाही सतर्क करण्यात आले आहे.
कमी लसीकरणाबाबत पंतप्रधानांची बैठक
कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या जिल्ह्यांसोबत पंतप्रधान आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत पहिल्या डोसचे 50% पेक्षा कमी कव्हरेज आणि कोविड लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि इतर राज्यांमधील 40 हून अधिक जिल्ह्यांतील डीएमशी पंतप्रधान संवाद साधतील. ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण कमी आहे. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत कोविड 19 संसर्ग प्रतिबंध लसीकरण आढावा संदर्भात चर्चा करणार आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत कोविड 19 संसर्ग प्रतिबंध लसीकरणा संदर्भात प्रदिर्घ चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट दिलंय. त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवला जाणार आहे. त्यासाठी आता घरोघरी जाऊनही लसीकरण मोहीम राबवण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात आज होणाऱ्या चर्चेतून काय नवीन निर्णय घेतले जातायेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus