17 डिसेंबर : ऐतिहासिक लोकपाल विधेयकाच्या मंजुरीसाठी आज मंगळवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्ष भाजपमध्ये या विधेयकावरून आता एकजूट झाली आहे. या विधेयकावर प्रथम राज्यसभेत चर्चा होईल आणि त्यानंतर ते मंजूर केले जाईल, असा विश्वास संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.
आज मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत लोकपाल विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यावर काल सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांचे एकमत झाले. मात्र, या बैठकीवर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने बहिष्कार घातला. समाजवादी पक्षाचा विरोध पाहता विधेयक मंजूर करताना भर सभागृहात जर पक्षसदस्यांनी गोंधळ घातला तर चर्चेविनाच लोकपालावर शिक्कामोर्तब करण्यात येईल", असंही कमलनाथ म्हणाले. तर दुसरीकडे, समाजवादी पार्टी सोबतच आता शिवसेचा ही या विधेयकाला विरोध आहे. राज्यसभेत जर मतदान झाले तर शिवसेना विरोधात मतदान करेल अशी सूत्रांची माहिती आहे. विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी यूपीए सरकार समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे मन वळवू शकते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. अण्णांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अण्णांची प्रकृती लक्षात घेऊन ससून हॉस्पिटलतर्फे यादवबाबा मंदिरात इमर्जन्सी कक्षही उभारण्यात आला आहे. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणवासीय आज मौन व्रत पाळणार आहेत.