प्रदीप भणगे, दिवा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 गावांना महत्त्व आलं होतं. तसंच महत्त्व ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा शहराला आलं आहे. दिव्यातून आता 11 नगरसेवक निवडून जाणार असल्यानं सगळ्याच पक्षांचा दिव्यात वाढता वावर दिसू लागला आहे.
दिव्यामध्ये सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मनसेनंही डंम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा समोर करत प्रचार सुरू केला आहे. तर भाजप आणि शिवसेनेमध्येही आरोप प्रत्यारोप चालू आहेत. दिवेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत भाजपनं एक सीडीच प्रकाशित केली आहे. दिव्याला नेहमीच सापत्न वागणूक दिली गेली आहे, असं म्हणत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करतेय. दिव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाची भाजपमध्ये भेसळ झाल्यामुळे केळकर असे आरोप करताहेत, असा टोला शिवसेनेचे उत्तर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी लगावला आहे. दिव्यातल्या अकरा जागा जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष जय्यत तयारी करतोये. पण असुविधांचं माहेरघर बनलेलं दिवा नेमकं कुणाच्या पारड्यात झुकतं माप टाकणार हे मात्र बघावं लागेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv