10 फेब्रुवारी : तेलंगणाच्या मुद्द्यावरून आज (सोमवारी) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गदारोळ घालणार्या खासदारांना आपल्या जबाबदारीची आठवण करून दिलीय. आपल्या अभिभाषणात त्यांनी सभागृहाच्या कार्यपद्धतीबाबत सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला दिलाय.
त्यांनी म्हटलंय, ‘संसद ही लोकशाहीची गंगोत्री आहे. जर गंगोत्रीच प्रदूषित झाली तर गंगा स्वच्छ राहू शकत नाही. सर्व सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि सभागृहाच्या परंपरा आणि नियमांचं पालन करावं. संसदेचं काम चर्चा करणं, निर्णय घेणं हे आहे, गदारोळ घालणं नाही. अशा शब्दात प्रणव मुखर्जी यांनी खासदारांना फटकारले. राज्यसभेत स्वतंत्र तेलंगणाच्या विधेयकाला विरोध करणार्या सभासदांनी संसदेच्या वरिष्ठ सदनात हुल्लडबाजी केली.
तर वेगळ्याच मुद्द्यावरून गदारोळ घालणार्या अण्णाद्रमुकच्या खासदारांनी उपसभापतींसमोर कागद भिरकावले आणि माईकही फेकला. तिकडे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तेलंगणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विरोधकांना बोलावलं. संसदेचं ठप्प झालेलं काम सुरू करण्यावर चर्चा केली जाणार आहे.. पंधराव्या लोकसभेमध्ये आतापर्यंत सर्वात कमी विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. या लोकसभेच्या कार्यकाळातल्या सर्वात शेवटच्या अधिवेशनातही कामकाज सुरळीत पार पडत नाही. अजूनही काही महत्त्वाची विधेयकं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.