मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सरकारला आली जाग, 2 दिवसांत गारपीटग्रस्तांना मदत

सरकारला आली जाग, 2 दिवसांत गारपीटग्रस्तांना मदत

  t3tgsefg10 मार्च : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी अखेर सरकार खडबडून जागं झालंय. उमेदवारी आणि प्रचारात दंग असलेल्या राजकीय नेत्यांनी आता, गारपीटग्रस्त भागाचे दौरे सुरू केले. मदत आणि पुनर्वसन मंत्री पंतगराव कदम यांनी गारपीटग्रस्तांसाठी एक महत्वाची माहिती दिलीय.

  या संकटात सापडलेल्यांना मदत देण्यासाठी आता, निवडणूक आयोगानं परवानगी दिलीय. याबद्दल मुख्यमंत्र्यांशीही पंतगरावांची चर्चा झालीय. 2 दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन मदत जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलंय. गेला आठवडाभर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, सोलापूर, बारामती, इंदापूर या भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं थैमान घातलंय.

  गारपीटग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईची वाट पाहत आहे. अखेर या शेतकर्‍यांना मदत मिळणार हे जाहीर झालंय. ही मदत लवकरात लवकर जाहीर करू, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. उद्यापासून मुख्यमंत्री गारपीटस्त भागाच्या दौर्‍यावर आहेत.

  शरद पवार, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे दौर्‍यावर

  गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यात 50 हजारांपेक्षा जास्त हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. या गारपीटग्रस्त भागाला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज भेट दिली. परळी तालुक्यातल्या मांडवा, पांगरी, कवडगाव इथे त्यांनी दौरा केला आणि शेतकर्‍यांबरोबर चर्चा करून त्यांना दिलासा दिला. लवकरच भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, मात्र जोपर्यंत नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत मदत देता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गारपीट ग्रस्त भागाचा उद्यापासून दौरा करणार आहेत. दुसरीकडे, मनसेप्रमुख राज ठाकरे उद्या औरंगाबाद आणि बीड दौर्‍यावर जाणार आहेत. तिथं ते अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तर इतर गारपीटग्रस्त भागांना मनसेचे वरिष्ठ नेते भेट देणार असल्याचं सांगण्यात आलं. गारपीटग्रस्त भागांचा दौरा झाल्यानंतरच मनसे लोकसभेची दुसरी यादी जाहीर करणार आहे.

  बळीराजा हवालदिल

  तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासोबतच बारामती पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यात काल गारपीटीने झोडपून काढलंय. वादळी वार्‍यासह झालेल्या गारांच्या पावसाने गहू,हरभरा,द्राक्ष,डाळिंब, ऊस आणि भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यानं शेतातली उभी पिकं जमीनदोस्त झाली आहे. शेतात गारांचा खच पडलाय आणि शेतकर्‍याच्या डोळ्यात पाणी जमा झालंय. सोलापूर- पंढरपूर मार्गावरच्या पुळूज, औंढी, वरकुटे आणि कुरुल गावांना गारपिटीचा चांगलाच फटका बसलाय. गावातल्या घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत. शेतात चालत जायचं म्हटलं तरी गारांच्या लादीवरुनच चालत जावं लागतंय.

  First published:

  Tags: Marathwada, Parbhani, Sharad pawar, Vidarbha, Vidharbha rain