12 जुलै : शेतकर्यांना पूर्ण कर्जमाफी देणं हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणं गरजेचं असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्यांना कर्जमाफी देण्याची विरोधकांची मागणी स्पष्टपणे फेटाळली आहे. 2008 मध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत शेतकर्यांचा काहीच फायदा झाला नाही, याउलट बँकांना फायदा झाला असा दावाही त्यांनी केला आहे.
राज्यात उद्यापासून सुरू होणार्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतकर्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या मागणीवर फडणवीस म्हणाले, कर्जमाफी देणं हा पर्याय असला तरी त्यातून शेतकर्यांचा फायदा होणार नाही. त्यासाठी शेतकर्यांच्या कर्जाचं पुनर्गठन तीन ऐवजी पाच वर्षांसाठी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पहिल्या वर्षीचं संपूर्ण व्याज हे सरकार भरेल. तर त्यापुढच्या चार वर्षांचं निम्म व्याज सरकार भरेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यंदा गेल्या पाच वर्षांत मिळालं नाही, इतकं कर्ज शेतकर्यांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतकर्यांसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्याची योजना तयार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बँकांचा नफा झाला आणि बँकांमधले घोटाळे झाकले गेले. अगोदरच्या कर्जमाफीत बँकेना दिलेल्या निधीपैकी 25 टक्के रक्कम शेतीत गुंतवली असती तर शेतकर्यांना फायदा झाला असता. शेतकर्यांना विविध साहित्यखरेदीसाठी अनुदान, कृषी पंप देणे अशा योजनांवर पैसे खर्च केले असते तर राज्यातील शेतकर्यांची क्रयशक्ती वाढली असती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमचे सरकार शेतकर्यांना सक्षम करण्यावर भर देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकर्यांच्या कर्जफेडीची पुनर्रचना केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात 90 लाख हेक्टर जागेवर पेरणी झाली असून पावसात खंड पडल्याने सुमारे 23 लाख हेक्टरवरील पेरणी अडचणीत आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथे 1 ऑगस्टपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचार्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही आमची बाजू मांडली आहे, आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही. मात्र तरीदेखील आम्ही सर्व प्रकारच्या चौकशींसाठी तयारी आहोत. सत्ताधारी बाकांवरील मित्रपक्षांमध्ये कुरबुर सुरू आहे. यावरूनही विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केलीय. पण, आम्ही सज्ज आहोत. विरोधकांनी गोंधळ घालण्याऐवजी प्रश्न मांडा, चर्चा करा, आम्ही उत्तरं देऊ, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच शिवसेना आणि भाजपात कोणतेही मतभेद नाही, हम साथ साथ है अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++