07 जानेवारी : बीडमध्ये माझ्या विरोधात अजित पवारांना तगडा उमेदवार सापडला नाही. माझ्या दृष्टीने खरा तगडा उमेदवार अजित पवार हेच आहे. त्यांनी बीडमधून निवडणुकीसाठी उभे राहावे मी त्यांचं स्वागत करतो. होऊन जाऊ द्या एकदा असं सांगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्विकारलंय. काही दिवसांपुर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीला तगडा उमेदवार हवाय. कुणी नाही मिळाला, तर मीही उभा राहीन, असं अजित पवार म्हणाले होते. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी गोपीनाथ मुंडे यांची खास मुलाखत घेतली यावेळी त्यांनी अजित पवारांचं आव्हान जाहीरपणे स्वीकारत बीडमध्ये निवडणूक लढवण्याचं आमंत्रण दिलंय.
गोपीनाथ मुंडे विरुद्ध अजित पवार हा सामना अख्ख्या महाराष्ट्राला चांगलाच माहित आहे. मुंडे यांच्या हाताखालून त्यांच्या पुतण्या धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात आणण्याचा पराक्रम अजित पवारांनी करुन दाखवला. त्यामुळे बीडच्या राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना न राहता गोपीनाथ मुंडे विरुद्ध अजित पवार असाच राहिला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महायुतीत प्रवेश केल्यामुळे महायुतीची ताकद वाढलीय. स्वाभिमानी महायुतीत आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला फायदा होणार हे स्पष्ट दिसतंय. तसं महायुतीचे नेतेही आता बोलत आहे. गोपीनाथ मुंडेंनी 'स्वाभिमानी'मुळे कसा फायदा होईल याबद्दलचा खुलासा आयबीएन लोकमतकडे केलाय.
'पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला संधीच देणार नाही'
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांसाठी लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही संघटना नसून चळवळ आहे. या संघटनेनं ऊस,दुधाच्या प्रश्नी सरकारशी संघर्ष करुन लाठ्या-काठ्या खाऊन न्याय मिळवून दिलाय. त्यामुळे स्वाभिमानीचा चांगला प्रभाव आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगलं यश मिळवलं होतं. आमची धावपळ फक्त सोलापूर ते कोल्हापूर या पट्ट्यात होतं होती. आता सुदैवाने याचा भागात 'स्वाभिमानी'चा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे याभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आम्ही तगडा मुकाबला देऊ शकतो. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीला संधी सुद्धा देणार नाही असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला.
राजू शेट्टींना नाराज करणार नाही
तसंच स्वाभिमानी संघटना आता एनडीए, महायुतीचा घटक बनला आहे त्यामुळे लोकसभेत निश्चित यश मिळेल. राहिला जागे वाटपाचा प्रश्न तर आम्ही आम्ही मुद्यावर एकत्र आलोय. त्यामुळे त्याची जागा आमची जागा अशी नसून ती महायुतीची जागा असणार आहे. त्यांना जागेसाठी नाराज करणार नाही असंही मुंडे म्हणाले.
'होऊन जाऊ द्या'
बीडमध्ये माझ्या विरोधात अजित पवारांना तगडा उमेदवार सापडला नाही. माझ्या दृष्टीने खरा तगडा उमेदवार अजित पवार हेच आहे. त्यांनी बीडमधून निवडणुकीसाठी उभे राहावे मी त्यांचं स्वागत करतो. होऊन जाऊ द्या एकदा असं सांगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्विकारलंय.
'आप'चा धोका आघाडी सरकारलाच
तर आम आदमी महाराष्ट्रात सर्व जागांवर लढत असला तरी त्यांची सदस्य नोंदणी आता सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सदस्यांना किती पाठिंबा मिळतो हे त्यावर अवलंबून आहे. पण 'आप'चं आम्हाला आव्हान नाही. दिल्लीत आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. ही पार्टी जर महाराष्ट्रात उभी राहिली तर याचा फायदा आम्हालाच होईल. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांचा धोका आहे असा दावाही मुंडेंनी केला. या लोकसभेत युतीच्या 21 आणि 'स्वाभिमानी'च्या 2 जागा मिळून 23 जागा झाल्यात.लोकसभा निवडणुकीत आम्हाला कमीत कमी 10 जागांचा फायदा होईल आणि ही संख्या 33 अशी होईल असा विश्वासही मुंडेंनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.