02 मार्च : ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीत सर्व विरोधकांच्या जागांची गोळाबेरीज करूनही बहुमताचा आकडा गाठता येत नसतानाही भाजपने शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे. त्यामुळं ठाण्यातील महापौरपदाची निवडणूक काही प्रमाणात चुरशीची होणार आहे.
ठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेनेने मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौरपदासाठी रमाकांत मढावी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेनेने उपमहापौरपदावरही दावा केल्याने ठाण्यात युती होण्याची आशा ठेऊन असलेल्या भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाण्यात शिवसेना सत्तेत वाटा देणार नसल्याचं स्पष्ट झाल्याने भाजपने आशादेवी शेरबहाद्दूरसिंग यांचं नाव महापौरपदासाठी तर मुकेश मोकाशी यांचं नाव उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.
131 सदस्य संख्या असलेल्या ठाणे पालिकेत शिवसेनेचे 67, भाजपचे 23, राष्ट्रवादीचे 34, काँग्रेसचे 3, एमआयएमचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक आहेत.
ठाणे पालिकेत शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत तर दुसरीकडे भाजपचे फक्त 23 नगरसेवक निवडून आलेत. त्यात भाजपने सर्व विरोधकांची जरी गोळाबेरीज केली तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठणं अशक्य आहे. असं असतानाही भाजपनं महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, BMC, Shivsena, Thane municipal corporation, उद्धव ठाकरें, भाजप, महापौर