24 ऑक्टोबर : कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मौन सोडलंय. सीबीआय चौकशीला तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपण कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि आपल्याजवळ लपवण्यासारखं काहीच नाही, असं ते म्हणाले. रशिया आणि चीनच्या दौर्यावरून परत येताना विमानात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोळसा घोटाळ्याप्रकरणी उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय. या प्रकरणी मंगळवारी सीबीआयने सुप्रीम कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केलाय. यात कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्या विरोधात सीबीआयने जो एफआयआर दाखल केलाय, यावर सीबीआय ठाम आहे. बिर्लांविरोधात तपास सुरूच राहणार असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण, या घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांची चौकशी होणार का, याबाबत सीबीआयच्या स्टेटस रिपोर्टमध्ये काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. आज पंतप्रधानांनी कोळसा घोटाळ्या प्रकरणी चौकशी सामोर जाण्याची तयारी दाखवलीय या अगोदरही कोळसा घोटाळ्यावरून पंतप्रधानांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.