नवी दिल्ली, 21 जून : महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे
(Eknath Shinde) यांचं बंडखोरी नाट्य रंगलं असताना तिकडे दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांनी उमेदवार घोषित केला आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह 13 विरोधी पक्षांनी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा
(yashwant sinha) यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत
(Presidential Elections) विरोधी उमेदवार म्हणून नाव देण्यास सहमती दर्शवली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपकडून अद्याप कोणतही नाव समोर आलेलं नाही. मात्र, काही नावांची चर्चा नक्की सुरू आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी संसद भवनात जमलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी सिन्हा यांच्या नावावर एकमत केल्याचे सूत्रांनी सांगितले. पवार, गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर सिन्हा यांचे नाव पुढे आले. यशवंत सिन्हा हे दोनदा केंद्रीय अर्थमंत्री राहिले आहेत. ते पहिल्यांदा 1990 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये आणि नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री होते. वाजपेयी सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्रीही होते. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संयुक्त विरोधी पक्षाचे निवेदन वाचून दाखविताना सांगितले की, मोदी सरकारने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत एकमत निर्माण करण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत याची आम्हाला खेद आहे.
रिक्षाचालक ते शिवसेनेचे शक्तीशाली नेता! एकनाथ शिंदे यांची बंडखोरी पक्षाला का परवडणारी नाही
भाजपचा उमेदवार कोण?
भाजपकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत भाजपने सध्या तरी खुलासा केलेला नाही, मात्र भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू आहे. सध्या अशी अनेक नावे आहेत ज्यांच्या चर्चा जोरात सुरू आहेत.
आनंदीबेन पटेल (80 वर्षे) - आनंदीबेन पटेल सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत आणि यापूर्वी त्या गुजरातच्या मुख्यमंत्री होत्या. आनंदीबेन या त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होत्या आणि त्या पंतप्रधान मोदींच्या सर्वात विश्वासू मानल्या जातात. गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि देशातील ओबीसी वर्गाला मोठा संदेश दिल्याने भाजप आनंदीबेन यांच्यावर बाजी मारू शकते, असे मानले जात आहे.
डॉ. तमिलिसाई सुंदरराजन (61 वर्षे) - डॉ. तमिलिसाई, भाजपच्या माजी राष्ट्रीय सचिव, सध्या तेलंगणाचे राज्यपाल आहेत आणि पाँडिचेरीच्या एलजीचे अतिरिक्त काम पाहत आहेत. डॉ. तमिलिसाई या व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्या मूळच्या चेन्नई, तामिळनाडू येथील आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्या भाजपच्या विश्वासू आहेत. दक्षिणेत भाजप विस्तार योजनेंतर्गत संदेश देण्यासाठी भाजप तमिळसाईंवर पैज लावू शकते.
थावरचंद गेहलोत (74 वर्षे) - भाजपचे विश्वासू दलित नेते आहेत. मध्य प्रदेशातील आगामी निवडणुकीत दलितांना एक संदेश देण्यासाठी आणि राज्यातील मतदारांना संदेश देण्यासाठी थावरचंद गेहलोत यांची लॉटरी लागू शकते.
राष्ट्रपतीपदाचा तोरा नाही की नोकर-चाकर नाही, पगारही देशासाठी दान, असे President होणे नाही
आचार्य देवव्रत (63 वर्षे) - पीएम मोदींचे विश्वस्त, संघाचे लाडके आणि अतिशय स्वच्छ प्रतिमा. ते दीर्घकाळ संघाचे प्रचारकही आहेत. गुरुकुलच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा नवा अध्याय लिहिला आहे. सध्या ते गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपला जातीचे राजकारणही टाळता येईल.
द्रौपदी मुर्मू (64 वर्षे) - देशातील 47 ST राखीव लोकसभेच्या जागा आणि देशातील आदिवासींना संदेश देण्यासाठी द्रौपदी मुर्मूवर भाजप डाव लावू शकतात. भविष्यात भाजप ओडिशा विस्ताराअंतर्गत मुर्मू यांच्या नावाचाही विचार करू शकते.
व्यंकय्या नायडू - देशाचे उपराष्ट्रपती आणि भाजपचे माजी अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या नावावर भाजप साऊथ प्लान वर काम करू शकतो.
निर्मला सीतारामन- देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन चेन्नईच्या आहेत. दक्षिण योजनेअंतर्गत भारतीय जनता पक्ष निर्मला सीतारामन यांच्या नावाचाही विचार करू शकतो. निर्मला ह्या पंतप्रधानांच्या अत्यंत विश्वासू समजल्या जातात.
याशिवाय केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद, देशाचे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावावरही भाजप विचार करत आहे. असे करून भाजप जगभरातील मुस्लिमांना संदेश देऊ शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.