बंगळुरू, 27 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नाश कधी होणार? कोरोनाव्हायरसवर प्रभावी उपचार कधी येणार? याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञांचे यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. अशात जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation) शास्त्रज्ञांनी अशी शक्यता वर्तवली आहे की, कोरोनाव्हायरसची लस वर्षभरात येईल मात्र तोपर्यंत हा आजार सामान्य तापासारखा होईल.
WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन (Soumya Swaminathan) यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे.
सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं, "व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर 3 महिन्यांतच 7 लसींचं ह्युमन क्लिनिकल ट्रायल सुरू झालं आहे. जर सर्वकाही सुरळीत झालं आणि आपल्याला नशीबानं साथ दिली तर 9 ते 12 महिन्यांत कोरोनाव्हायरसविरोधातील लस आपल्याकडे असेल आणि असं झालं, तर शास्त्रज्ञांसाठी हे अभूतपूर्व असं यश असेल. पुरेशा लोकांमध्ये अँटिबॉडीज किंवा लसीकरणामार्फत व्हायरसविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल आणि हा आजार तितका धोकादायक राहणार नाही"
हे वाचा - भारताचा चीनी कंपन्यांना दणका, रद्द केल्या Rapid Test Kitsच्या ऑडर्स
सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या, "प्रभावी लस येईपर्यंत हा नवा कोरोनाव्हायरस इतर इन्फ्लूएंझा व्हायरसप्रमाणे सिझनल व्हायरस होईल. ज्याचा उद्रेक वर्षातून एकदा किंवा दोनदा होईल. म्हणजे हा आजारच सर्वसामान्य होईल, ज्यामुळे लोकं सतत आजारी पडतील मात्र त्याचा त्यांच्यावर फारसा प्रभाव पडणार नाही.
"अद्यापही बहुतेक लोकांना या व्हायरसचा धोका आहे, त्यामुळे आता हा व्हायरस आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे, हे स्वीकारावं लागेल. आणि त्याचदृष्टिने त्याला सामोरं जायला हवं. फिजिकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता हा दैनंदिन सवयीचा भाग होण्याची गरज आहे. पुढील काही वर्ष एकाच ठिकाणी भरपूर लोकांची जमणं, गरजेशिवाय प्रवास करणं हे सर्व टाळायला हवं. अशी आवश्यक ती खबरदारी घेऊन सर्वसामान्य जनजीवन सुरू करायला हवं", असंही सौम्या स्वामिनाथ म्हणाल्या.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - जगातील सर्वात डेंजर लॅब; जिवंत माणसांवर जीवघेणे प्रयोग, वाचून अंगावर येईल काटा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus