नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहेत. एकीकडे सामान्य जनता यावर त्रस्त होऊन सरकारवर आपला रोष व्यक्त करताना दिसत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाने सुद्धा सरकारला या मुद्द्यावर घेरून ठेवलंय. कॉंग्रेस, सपा, बसपा व्यतिरिक्त आता तृणमूल कॉंग्रेस (TMC) चे नावही यात जोडलं गेलं आहे. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata banerjee) यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी ई- स्कुटर वरून प्रवास केला. या प्रवासादरम्यान स्कुटर वर मागे बसलेल्या ममता बॅनर्जी यांनी गळ्यात महागाई विरोधात पोस्टर देखील अडकवले होते. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
#WATCH | West Bengal Chief Minister Mamata Banerjee travels on an electric scooter in Kolkata as a mark of protest against rising fuel prices. pic.twitter.com/q1bBM9Dtua
— ANI (@ANI) February 25, 2021
पेट्रोलच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी कोलकताचे महापौर फिरहाद हकीम यांच्यासोबत इलेक्ट्रिक स्कूटर वरून प्रवास केला. कोलकातामध्ये ही ई-स्कूटर रॅली हरीश चटर्जी स्ट्रीट ते राज्य सचिवालय नबन्ना इथपर्यंत काढण्यात आली होती. ममता बॅनर्जी यांनी हाजरा मोड ते राज्य सचिवालयात जाण्यासाठी पाच किलोमीटरचा प्रवास ई-स्कूटर वरून केला आणि यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लोक मुख्यमंत्र्यांना अभिवादन करताना दिसून आले. (हे वाचा - माहेरच्यांनाही संपत्ती देण्याचा महिलांना हक्क, वारसा हक्कावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय) ममता बॅनर्जी यावेळी मोदी सरकारवर सुद्धा जोरदार हल्ला चढवताना दिसल्या. त्या म्हणाल्या की, ‘आधी नोटबंदी होती आणि आता सरकार इंधनाचे दर वाढवत आहे. मोदी सरकार सर्व काही विकत आहे. बीएसएनएल पासून ते कोळसा पर्यंत सर्व काही या देशात विकलं जात आहे. हे सरकार लोकविरोधी आहे.’