मुंबई, 15 ऑगस्ट: आज काल आंतरजातीय विवाह ऑनर किलिंगचं कारण ठरत आहेत. तसंच आधुनिक काळातही हुंडाबळीची प्रकरणंही घडत आहेत. अशात या आदिवासी पाड्यांमधली लग्नसंस्कृती ही खरंच आदर्श म्हणावी अशी आहे. तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम (Villupuram) आणि कल्लाकुरची (Kallakurichi) जिल्ह्यांमध्ये इरुलर (Irular), काटुनायकन (Kaatunayakan) आणि मलय कुरावन (Malai Kuravan) या आदिवासी समाजांचे पाडे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दहा टक्के लोकसंख्या या समाजाची आहे. मलय कुरावन समाजात लग्नाची पद्धत (Malai Kuravan marriages) अगदी साधी असते. वर आणि वधू उपस्थित नसतानाही लग्नसोहळा पार पडू शकतो. केवळ मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांनी हात मिळवले, की लग्न पार पडलं असं मानतात. यामध्ये इतर संस्कृतींप्रमाणे कोणतेही विधी पार पाडले जात नाहीत. या पाड्यातले लोक हुंडाही देत नाहीत. कारण आपण मुलीला दुसऱ्यांच्या घरी पाठवतोय असं न मानता, मुलाचे कुटुंबीय आपल्या कुटुंबात सामील होत आहेत असं मानतात. 11 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन (World Indigenous Day) साजरा करण्यात आला. दी न्यू इंडियन एक्स्प्रेस ने तमिळनाडूच्या काही आदिवासी पाड्यांमधल्या लग्नसंस्कृतीबाबत (Tamil Nadu Tribes Wedding culture) वृत्त दिलं आहे. या समाजातल्या के. तीर्थगिरी (48) नावाच्या व्यक्तीने या विवाह संस्कृतीबाबतची माहिती दिली आहे. हे वाचा- आदिवासी महिलांनी बनवलेल्या साबणांना अमेरिकेतून मागणी, पाहा किंमत आणि वैशिष्ट्यं मीडिया अहवालानुसार, या समाजातल्या विवाहसोहळ्यांमध्ये, विवाह करार म्हणून विड्याची नऊ पानं, नऊ सुपाऱ्या आणि 35 रुपये वापरले जातात. या सोहळ्यात करार करताना वापरण्यात येणारी रक्कम 18 वेरानी असते. ‘वेरानी’ (Verani) हे तिथलं स्थानिक प्रमाण आहे. एक वेरानी म्हणजे 3.50 रुपये होतात. 18 वेरानींचे एकूण 63 रुपये होतात. यांपैकी 35 रुपये विवाह करारामध्ये वापरण्यात येतात, तर उरलेली रक्कम वराच्या कुटुंबीयांना दिली जाते. हुंड्यापेक्षा ही रक्कम वेगळी असते. कारण, नवदाम्पत्याला मुलगी झाल्यास, मुलीकडचे कुटुंबीय तिच्यावर हक्क सांगू शकतात. इरुलर समाजामध्ये लग्नसोहळ्यात काही प्रमाणात विधी (Irular Community marriage rituals) केले जातात. त्यांच्या कुलदैवतासमोर, पाड्यातली वयोवृद्ध व्यक्ती वर आणि वधूचं लग्न लावून देते. या समाजात प्रेमाला अतिशय महत्त्व आहे. मुलगा आणि मुलीमध्ये प्रेम असेल, तरच ते सुखाने एकत्र संसार करू शकतात, अशी या समाजातल्या लोकांची भावना आहे. त्यामुळेच या समाजातले लोक आंतरजातीय विवाहाच्याही विरोधात नाहीत. जातीचा गर्व, ऑनर किलिंग असे प्रकार इथे होत नाहीत, अशी माहिती पी. मारी यांनी दिली. ते इरुलर समाजाचेच सदस्य असून, व्यवसायाने शिक्षक आहेत. यासोबतच, ते एक समाजसेवकही आहेत. हे वाचा- लग्नाच्या 8 वर्षांनंतर पडली प्रेमात; पतीने घटस्फोट देऊन पत्नीचं लावलं दुसरं लग्न या मीडिया अहवालानुसार, काटुनायकन समाजातले लग्नसोहळे बऱ्यापैकी मोठे असतात. विवाह कराराच्या बोलणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या कुटुंबातले सदस्य गाणी गातात. दोन्ही बाजूंकडचं जे काही म्हणणं असतं, ते गाण्यांच्या रूपातच समोर मांडलं जातं. आपापल्या कुटुंबाचा इतिहास, आपल्या मुलांबाबतची माहिती, घरातली खाद्यसंस्कृती आणि कलेबाबतही या गाण्यांमधूनच माहिती दिली जाते. यानंतर गाण्यातूनच दोन्हीकडचा होकार येतो आणि दोन्ही कुटुंबीय एकमेकांना शुभेच्छा देत हे लग्न झाल्याचं सांगतात. अशा प्रकारे हा सोहळा होतो, अशी माहिती के. इलुमलई पेरुमल यांनी दिली. या तिन्ही समाजांमध्ये लग्नासाठी जोडीदार निवडण्याची कसलीही कडक बंधनं नाहीत. प्रेमविवाह, किंवा मग आंतरजातीय प्रेमविवाहदेखील इथे सहजपणे स्वीकारले जातात. यासोबतच, हुंड्याची पद्धतही इथे अस्तित्वात नाही. अर्थात, मागील काही वर्षांपासून इतर समाजातल्या चालीरीती पाहून वेगवेगळ्या मार्गांनी हुंडा देण्याचे किंवा मागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत; मात्र अजून ते कमी आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.