मुंबई, 29 ऑक्टोबर : देशभरात पावसाने उसंत घेतल्याने काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये थंडीसोबत प्रदुषणात वाढ झाल्याने दिल्लीकरांचा श्वास कोंडला जात आहे. दिवाळीनंतर थंडी वाढल्याने दिल्लीसह अन्य राज्यातही थंडी सोबत प्रदुषणात वाढ झाली आहे. यूपी-बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आता थंडीने हाहाकार माजवण्यास सुरू केले आहे. दरम्यान थंडी वाढल्याने उत्तर भारतात पाऊस थांबला आहे. काही प्रमाणात दक्षिण भारतातील राज्यांनाच ढगांचा धोका असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून दिल्लीसह मुंबईतही हवामान खराब झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये उत्तर प्रदेश-बिहारसह पावसाचा कोणताही अंदाज नाही. मात्र, या भागातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. मात्र पुढील चार दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर ते हिमाचल या डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमानात घट दिसून येत आहे. याचबरोबर महाराष्ट्रातही पुढचे 10 दिवस हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा : सीतरंग चक्रीवादळाचा हाहाकार, महाराष्ट्रात सीतरंग थैमान घालणार?
या राज्यात पावसाची स्थिती
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवस तामिळनाडू, केरळ, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये हलका पाऊस पडणार आहे. या राज्यांमध्ये पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने कुठे काय अंदाज वर्तवला?
केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशात आज पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये 31 ऑक्टोबरला पावसासोबत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांमध्ये आधीच बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे तेथील तापमानात कमालीची घट होत आहे. त्याचबरोबर देशाच्या इतर भागात हवामान कोरडे राहील. यूपी-बिहार आणि झारखंडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. यामुळे छठ पूजेवर पावसाचे पावसाचे सावट नसल्याने छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
हे ही वाचा : पाऊस, ऊन आणि वादळ सर्वात आधी तुम्हाला मिळेल अलर्ट; असे व्हा हवामान शास्त्रज्ञ
दिल्लीत खराब हवामान
दिल्लीत थंडीसोबतच प्रदूषणाचा प्रभावही वाढू लागला आहे. दिल्लीत मागच्या काही दिवसांच्या तुलनेत हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ असल्याची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे प्रदुषनाचे कण जैसे थे राहिल्याने धुक्याचे सावट आले होते. काल (दि.28) किमान तापमान 14.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिल्लीतील खराब हवामान आणि विषारी हवेमुळे रुग्णालयांमध्ये अॅलर्जी आणि श्वसनाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
प्रदूषणाची पातळी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) गुरुवारी 333 होता आणि शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता तो 346 नोंदवला गेला. शुक्रवारी सकाळी 9:20 वाजता दिल्लीच्या आनंद विहार केंद्रातील AQI 443 वर होता, वजीरपूरमध्ये 380, पटपरगंजमध्ये 363, विवेक विहारमध्ये 397, पंजाबी बागेत 370 आणि जहांगीरपुरीमध्ये 397 नोंदवण्यात आली.