नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : देशभरात पावसाने परतीच्या प्रवास घेतल्यानंतर अचानक बंगालच्या उपसागरात वादळीची स्थिती निर्माण झाल्याने पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान सीतरंग चक्रीवादळाने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बांगलादेशला बसल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे.
चक्रीवादळ सीतरंगने बांगलादेशमध्ये किमान 35 जणांचा बळी घेतला आहे. तर सुमारे 8 दशलक्ष लोकांच्या घरातून वीज गेली आहे. बांगलादेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे सुमारे 10 हजार घरांचे नुकसान झाले आणि 6 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिके नष्ट झाली. हजारो मासेमारी प्रकल्पही वाहून गेले आहेत.
हे ही वाचा : सितरंग चक्रीवादळाचा धोका; भारतात ‘या’ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
याचबरोबर सीतरंग चक्रीवादळामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. देशातील आसाममधील परिस्थिती काल (दि. 25) सीतरंग चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे 83 गावांतील सुमारे 1100 लोकांना पुराचा फटका बसला. सीतरंग चक्रीवादळामुळे आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे 1146 लोकांना फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतरंगमुळे 325.501 हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. मागच्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या चक्रीवादळामुळे आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यात विविध भागात अनेक झाडे आणि विजेचे खांबही उन्मळून पडले.
उत्तर बंगालच्या उपसागरातून बांगलादेशच्या दिशेने 56 किमी प्रतितास वेगाने सरकलेल्या सीतारांगमुळे पश्चिम बंगालमधील दक्षिण, उत्तर आणि पूर्व मेदिनीपूर या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे नुकसान झाले. हवामान खराब झाल्यामुळे त्याचा प्रभाव दिवाळी आणि कालीपूजेवरही पडल्याचे दिसून आले.
हे ही वाचा : खुशखबर! मान्सूनचा परतीचा प्रवास संपला, हवामान खात्याची घोषणा
पश्चिम बंगाल सरकारने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. नबन्ना येथे एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्य सचिव हरी कृष्ण द्विवेदी यांनी जिल्हा दंडाधिकार्यांना पुरेसा मदत साठा करण्याचे निर्देश दिले होते आणि किनारी भागातील लोकांना बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. मच्छीमारांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.