Home /News /national /

दोन लग्नं, सौदीत नोकरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप; इस्लाम सोडून हिंदू धर्मात आलेले वसीम रिझवी आहेत तरी कोण?

दोन लग्नं, सौदीत नोकरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप; इस्लाम सोडून हिंदू धर्मात आलेले वसीम रिझवी आहेत तरी कोण?

उत्तर प्रदेशात (UP) योगी सरकार (Yogi Government) सत्तेवर आल्यापासून वसीम रिझवी (Waseem Rizvi) नेहमीच वादाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. देशातील नऊ मशिदी हिंदूंना सोपवण्याबाबतचं त्यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं.

  लखनऊ, 6 डिसेंबर : उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी (Waseem Rizvi) यांनी सोमवारी (6 डिसेंबर) इस्लाम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. वसीम रिझवी यांचं नवं नाव जितेंद्र नारायण त्यागी (Jitendra Narayan Tyagi) असं असेल. "इस्लाम धर्मातून मला बाहेर काढण्यात आलं. आता कोणता धर्म स्वीकारायाचा ही माझी इच्छा आहे. हिंदू धर्मात जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तितक्या सकारात्मक गोष्टी अन्य कोणत्याही धर्मात नाहीत", असं रिझवी म्हणालेत. यावर अर्थातच अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. उत्तर प्रदेशात योगी सरकार सत्तेवर आल्यापासून वसीम रिझवी नेहमीच वादाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. देशातील नऊ मशिदी हिंदूंना सोपवण्याबाबतचं त्यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. कुतुबमिनार परिसरात असलेली मशीद भारताला कलंक असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. तसंच मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा त्यांनी दहशतवादाशी संबंध जोडला होता. कुराणातले 26 आयत (कलमांना) हटवण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर शिया आणि सुन्नी समुदायाच्या उलेमांनी फतवा काढून रिझवी यांना इस्लाम धर्माबाहेर काढलं. हेही वाचा : शिया नेते वसीम रिझवी झाले नारायण सिंह त्यागी, हिंदू धर्मात प्रवेश; वाचा सविस्तर "मला जर इस्लाम (Islam) धर्माच्या बाहेर काढलं आहे, तर मग कोणता धर्म स्वीकारायचा हा माझा निर्णय असेल. सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म (Hindu Religion) हा जगातला एकमेव धर्म आहे, ज्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या अन्य कोणत्याही धर्मात नाहीत", असं हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवी म्हणाले. "इस्लामला मी धर्मच मानत नाही. दर शुक्रवारी नमाजपठण होतं. या नमाजानंतर माझं डोकं उडवण्याचे आदेश दिले जातात. अशा परिस्थितीत मला कुणी मुसलमान म्हटलं तर त्याची मला लाज वाटते", असंही ते म्हणाले.

  रिझवी यांचे कुटुंबीयही त्यांच्या विरोधात

  मुस्लिम समुदायाबरोबरच रिझवी यांचे कुटुंबीयही त्यांच्या विरोधात होते. त्यांनी वसीम रिझवी यांच्याबरोबरचं नातं तोडलं होतं. सोमवारी गाजियाबादमधील देवी मंदिरात यति नरसिंहानंद सरस्वतींनी त्यांना हिंदू धर्मात घेतलं. जितेंद्र नारायण त्यागी बनलेल्या वसीम रिझवी यांच्या वेशभूषेमध्येही आमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळाला. कपाळावर त्रिशूल काढलेले आणि भगवी वस्त्रं घातलेले रिझवी म्हणजेच जितेंद्र नारायण त्यागी हात जोडून देवाची पूजा करताना दिसले. हेही वाचा : फोटोग्राफरने मजेमजेत रचला विक्रम, शोधून काढलं चॉकलेटी फुलपाखरू

  वसीम रिझवी यांची 2004 साली वक्फ बोर्डाचे चेअरमन म्हणून नेमणूक

  2003 साली उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) मुख्यमंत्री झाले, तेव्हा वक्फ मंत्री आझम खान यांच्या शिफारशीवरून सपाचे नेते मुख्तार अनीस यांची शिया वक्फ बोर्डाचे चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली; पण अनीस यांच्या कार्यकाळात लखनौच्या हजरतगंजमध्ये वक्फची एक संपत्ती विकण्याला मौलाना कल्बे जव्वाद यांनी कडाडून विरोध केला होता. मौलाना यांच्या या विरोधामुळेच मुख्तार अनीस यांना बोर्डाच्या चेअरमनपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर मौलाना कल्बे जव्वाद यांच्या शिफारशीवरून 2004 मध्ये वसीम रिझवी यांना वक्फ बोर्डाचे चेअरमन म्हणून नेमण्यात आलं. 2007 मध्ये मायावती सत्तेत आल्यानंतर वसीम रिझवी यांनी सपा सोडून बसपाचा हात धरला. 2009 मध्ये शिया सेंट्रल वक्फ बोर्डानं त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ तर पूर्ण केला. त्यानंतर नव्या शिया बोर्डाची स्थापना झाली तेव्हा मौलाना कल्बे जव्वाद यांच्या संमतीनं त्यांचे मेहुणे जमालुद्दीन अकबर यांना चेअरमन म्हणून नेमण्यात आलं. वसीम रिझवी यांची सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर मग वसीम रिझवी आणि मौलाना कल्बे जव्वाद यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाली.

  वसीम रिझवी यांचा राजकीय प्रवास

  2010 मध्ये शिया वक्फ बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा तत्कालीन चेअरमन अकबर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर वसीम रिझवी पुन्हा एकदा वक्फ बोर्डाच्या चेअरमनपदी विराजमान झाले. तीन वर्षांनंतर म्हणजे 2012 मध्ये उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन झालं. समाजवादी पार्टीनं सत्तेवर आल्यानंतर 28 मे रोजी वक्फ बोर्डच बरखास्त केलं. वसीम रिझवी यांचे आझम खान यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे 2014 साली त्यांना वक्फ बोर्डाचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आलं. यावरूनच मौलाना कल्बे जव्वाद यांनी सपा सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. कल्बे जव्वाद यांनी समर्थकांसह रस्त्यांवर उतरून आंदोलन केलं; मात्र आजम खान यांच्या सत्तेतील प्रभावामुळे वसीम रिझवी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी कायम राहिले. 2017 मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर वसीम रिझवी यांनीही आपली राजकीय मतं पूर्णपणे बदलली. वसीम रिझवी यांनी वक्फ बोर्डाचे चेअरमन म्हणून आपला कार्यकाळ 18 मे 2020 रोजी पूर्ण केला; पण त्यांची पुन्हा अध्यक्षपदी मात्र नियुक्ती होऊ शकली नाही. अर्थात रिझवी अजूनही वक्फ बोर्डाचे सदस्य आहेत.

  वसीम रिझवी यांचं वैयक्तिक आयुष्य

  रिझवी यांचा जन्म शिया मुस्लिम परिवारात झाला. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. रिझवी सहावीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर रिझवी आणि त्यांच्या बहीण-भावांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. वसीम रिझवी त्यांच्या भावडांमध्ये सर्वांत मोठे होते. 12 वीच्या परीक्षेनंतर ते सौदी अरेबियात एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी जपान आणि अमेरिकेतही काम केलं. कौटुंबिक कारणांमुळे वसीम रिझवी परत लखनौला आले. त्यानंतर त्यांनी स्वत:चं काम सुरू केलं. लोकांशी त्यांचे खूप चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर रिझवी शिया मौलाना कल्बे जव्वाद यांच्या अगदी संपर्कात आले आणि शिया वक्फ बोर्डाचे सदस्य बनले. रिझवी यांची दोन लग्नं झाली आहेत. ही दोन्ही लग्नं लखनौमध्ये झाली. रिझवी यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आणि एक मुलगा, अशी तीन अपत्यं आहेत. या तिघांचीही लग्नं झाली आहेत. वसीम रिझवी यांच्यावर वक्फ संपत्तींमध्ये भ्रष्टाचार करण्याचे अनेक आरोप आहेत. या सर्व आरोपांवरून एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. कल्बे जव्वाद यांच्या प्रभावामुळे योगी सरकारने वक्फ संपत्तीवरच्या सर्व प्रकारच्या अवैध ताब्यांचा तपास सुरू केला. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. या परिसरातल्या पाच जिल्ह्यांमध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली वसीम रिझवी यांच्यासह एकूण अकरा लोकांवर खटला दाखल करण्यात आला आहे. सीबीआयनं (CBI) या परिसरातली शिया वक्फ संपत्ती बेकायदेशीर मार्गाने विकणं, खरेदी करणं आणि हस्तांतरित केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वसीम रिझवी जितेंद्र नारायण त्यागी बनले आहेत. हिंदू धर्म जगातील सर्वोत्तम धर्म असल्याचं वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र नारायण त्यागी म्हणजेच वसीम रिझवी यांच्याबाबतीत काय निर्णय घेतले जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
  First published:

  पुढील बातम्या