प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी
दिल्ली, 25 मे : कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर आनंदमय झालेल्या राज्यातील काँग्रेसमधून मतभेदाची मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोतले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात मध्यंतरी वाद झाला होता. पण आता विजय वडेट्टीवार हे सुद्धा पटोले यांच्याबद्दल तक्रार घेऊन दिल्लीत पोहोचले असल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांची तक्रार करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याच्या मोठे शिष्टमंडळ माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातखाली दिल्लीत पोहोचले आहे. चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तडकाफडकी हकालपट्टी नाना पटोले यांनी केली होती. नाना पटोले यांच्या हुकमशाहीच्या धोरणाविरोधात तक्रार करण्याकरिता हे शिष्टमंडळ हायकमांडच्या भेटीसाठी पोहोचले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
(नेत्यांच्या बड्डेला बैलगाडा शर्यत घेण्यास मनाई, अशी आहे संपूर्ण नियमावली)
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले वाद
याआधीही नाशिक पदवीधर निवडणुकीच्यावेळी नाना पटोले यांच्याविरोधात बाळासाहेब थोरात यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. बाळासाहेब थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामाच दिला होता. त्यानंतर त्यांनी एक पत्रही लिहिलं होतं.
तसंच, सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच खळबळजनक आरोप केले होते. नाना पटोले यांच्याकडून नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले होते. थोरात-तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं गेलं आणि त्याची स्क्रीप्ट लिहिली गेली, असे आरोप सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole