मराठी बातम्या /बातम्या /पुणे /नेत्यांच्या बड्डेला बैलगाडा शर्यत घेण्यास मनाई, अशी आहे संपूर्ण नियमावली

नेत्यांच्या बड्डेला बैलगाडा शर्यत घेण्यास मनाई, अशी आहे संपूर्ण नियमावली

 बैलगाडा शर्यतीसाठी नियमावली

बैलगाडा शर्यतीसाठी नियमावली

महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनासाठी अर्ज करावा.

रायचंद शिंदे आणि आसिफ मुरसल, प्रतिनिधी

पुणे/सांगली, 25 मे : बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने परिपत्रक काढले आहेत. 16 पानाचे हे परिपत्रक असून जवळपास 100 पेक्षा जास्त अटी आणि सूचना यात करण्यात आल्या आहेत. यामध्ये गावचे संस्कृती परंपरेनुसारचे धार्मिक सण उत्सव,यात्रा, यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढे नेत्यांच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यत भरवता येणार नाही.

आता राज्यात ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाईल. त्या त्या भागातील जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे, राजकीय पुढारी किंवा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यती घेता येणार नाहीत असे परिपत्रकात म्हटलं आहे. या निर्णयाचं बैलगाडा मालकांनी स्वागतच केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2017 आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम आणि अटी / शर्तीचे काटेकोरपणे पालन करुन बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात यावे, असे आदेश या पत्रकातून दिले आहे.

अशी आहे नियमावली

1- उक्त नमूद कायदा व नियम यामधील तरतूदींनुसार महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी देण्यात यावी..

2 -राजकीय कार्यक्रम, वाढदिवस इ. प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी कोणत्याही परिस्थितीमध्ये देण्यात येवू नये.

3- नमूद कायदा व नियम यामधील तरतूदींनुसार राज्यात केवळ बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी अशा प्रकारच्या 1000 मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या बैलगाडी शर्यतीस परवानगी आहे. राज्यात अनधिकृतपणे आयोजित होणाऱ्या आरत पारत, बैल-घोडा, लाकूड ओंडका ओढणे, चिखलगुट्टा, समुद्रकिनाऱ्यावरील शर्यती, टक्कर तसेच 1000 मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यती प्रतिबंधीत असतील.

4- नमूद कायदा व नियम यामधील तरतुदींनुसार बैलगाडी शर्यती आयोजित करू इच्छिणाऱ्या आयोजकांनी किमान 15 दिवस अगोदर यासोबत जोडलेल्या अनुसूची “अ” मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विहित नमुन्यामध्ये आयोजकाच्या ओळखींचा व पत्त्याच्या पुराव्यासह व बँक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात रु. 50000/- इतक्या प्रतिभूती ठेवीसह संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा.

5-अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जाची तपासणी करुन जेथे बैलगाडी शर्यत आयोजीत होणार आहे त्या ठिकाणी शर्यत आयोजित होण्यासारखी परिस्थिती आहे अथवा नाही याची तपासणी करण्यात यावी. यासाठी एका अथवा त्यापेक्षा अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. सदर अधिकारी प्रस्तावित बैलगाडी शर्यत आयोजन ठिकाणी भेट देवून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना 6 दिवसाच्या आत सोबत जोडलेल्या अनुसूची “इ” नुसार सादर करतील.

6- अर्ज प्राप्त झाल्यापासून ते परवानगी देणे अथवा नाकारणे याबाबतची कार्यवाही कामकाजाच्या ७ दिवसाच्या आत पुर्ण करतील.

7. परवानगी देतेवेळी जिल्हाधिकारी अर्जात नमूद बैलगाडी शर्यत आयोजनाच्या संपूर्ण कालावधीमध्ये उपस्थित राहण्यासाठी १) नायब तहसिलदार व २) पोलिस उप-निरिक्षक या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या २ अधिकाऱ्यांना त्यांच्या नावासह व पदासह आयोजनाचे "निरीक्षक" म्हणून प्राधिकृत करतील.

8. बैलगाडी शर्यतीच्या आयोजना दरम्यान अधिनियमांचे, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधीत शर्यत अथवा संपुर्ण शर्यतीचे आयोजन थांबविण्यास सदर "निरीक्षक" प्राधिकृत असतील.

9. सदर “निरीक्षक" शर्यतीसंबंधीचा अहवाल शर्यत आयोजन संपल्यानंतर ७२ तासाच्या आत सोबत जोडलेल्या अनुसूची “ई” नुसार जिल्हाधिकारी यांना सादर करतील.

10. शर्यतीच्या वेळी कधीही ज्या वळू अथवा बैलांमध्ये थकवा, निर्जलीकरण, अस्वस्थपणा, घोणा फुटणे, दुखापत इ. लक्षणे निरीक्षकांना अथवा समिती सदस्यांना आढळून आल्यास अथवा माहिती प्राप्त झाल्यास अशा वळू अथवा बैलांना बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेण्यास मज्जाव करण्यात यावा.

11. अहवालानुसार जर, आयोजकांनी नियमांचे, परवानगीच्या अटींचे उल्लंघन केल्यास अथवा या शर्यतीमध्ये भाग घेतलेल्यां व्यक्तींची माहीती, अर्ज, बैल / वळूचे आरोग्य दाखले, आयोजनाचे चित्रिकरण डिजीटल स्वरूपात २ प्रतित सादर न केल्यास अथवा

12. जिल्ह्यात विनापरवानगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन होत असल्याचे अथवा झाल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी व संबंधितावर तात्काळ गुन्हा नोंदविण्याची कारवाई करावी.

बैलगाडी शर्यतीचे आयोजकांची जबाबदारी:

1. बैलगाडी शर्यतीचे आयोजन करु इच्छिणाऱ्या आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याच्या किमान १५ दिवस आधी, यासोबत जोडलेल्या अनुसूची “अ” मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विहित नमुन्यामध्ये आयोजकाच्या ओळखीचा व पत्त्याच्या पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा.

2. सदर अर्जासोबत बँक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात रुपये पन्नास हजार इतक्या प्रतिभूती ठेवी जिल्हाधिकाऱ्याकडे जमा करणे बंधनकारक राहील.

3. महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनासाठी अर्ज करावा. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस इ. प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज सादर करु नये.

4. उक्त नमूद कायदा व नियम यामधील तरतूदींनुसार राज्यात केवळ बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी अशा प्रकारच्या १००० मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या बैलगाडी शर्यतीस परवानगी आहे. राज्यात अनधिकृतपणे आयोजित होणाऱ्या आरत पारत, बैल-घोडा, लाकूड ओंडका ओढणे, चिखलगुट्टा, समुद्रकिनाऱ्यावरील शर्यती, टक्कर तसेच 1000 मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यती प्रतिबंधीत असतील.

5. विनापरवानगी कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येवू नये. परवानगी प्राप्त झाल्यावर बैलगाडी शर्यतीसाठी केलेल्या अर्जात आणि दिलेल्या परवानगीत नमूद केलेल्या ठिकाणीच व दिनांकासच बैलगाडी शर्यतीचे आयोजन करावे.

6. बैलगाडी शर्यत रस्त्यावर किंवा महामार्गावर आयोजित करण्यात येवू नये. बैलांना किंवा वळूना धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आराम द्यावा.

7. कोणत्याही बैलांचा किंवा वळूचा वापर एका दिवसामध्ये 3 पेक्षा अधिक शर्यतीसाठी करण्यात येवू नये.

8. केवळ एका गाडीवानास बैलगाडी चालविण्यास परवानगी असेल.

9. अन्य कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बैलगाडी भोवती चालविता येणार नाही.

10. कोणताही गाडीवान किंवा बैलांच्या शर्यतीचा प्रस्ताव देणारी व्यक्ती, तिच्याकडे किंवा गाडीवर कोणतीही काठी, चाबुक, पिंजरी किंवा बैलास दुखापत करू शकेल किंवा बैलास विजेचा धक्का देऊ शकेल असे कोणतेही साधन किंवा उपकरण बाळगणार नाही.

11. बैलाचे पाय बांधणे किंवा बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबूक अथवा पिंजरी यासारखे कोणतेही साधन अथवा विद्युत धक्का किंवा अन्य साधनाचा वापरणे अथवा जननअंग पिळणे अथवा जननअंगावर लाथ मारणे अथवा आरुने जननअंगास इजा पोहोचवणे अथवा शेपूट पिरगळणे अथवा शेपटीचा चावा घेणे यास गाडीवानास प्रतिबंध असेल.

12. बैलगाडी शर्यतीकरिता वळू अथवा बैलांना इतर कोणत्याही प्रकारच्या इतर प्राण्यासोबत (उदा. घोडा) जुंपण्यात येणार नाही.

मोहिते पाटलांनी बैलगाडा मालकांना सुनावलं

दरम्यान, बैलगाडा शर्यत..हा शेतकऱ्यांचा खानदानी शौक..! पण शेतकऱ्यांची मुलही शिकायला हवी कारण कित्येक मुलं दहावीच्या परिक्षेलाच बसलीच नाही. इतकच काय तर आठवी नववीची मुल तर शाळेतही जात नसल्याचा धक्कादायक प्रकार खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटीलांनी खेड मध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीवेळी बोलताना सांगितलं.

'बाबानों...शिक्षण नसलेल्या मुलांना लग्नासाठी मुलीही देत नाही किंबहुना पसंतही करत नाही आणि बैलगाड्याचे शिक्षण सांगितलं तर लग्नासाठी मुली मिळतीलच याची खात्री नसल्याचा निर्वाळा यावेळी मोहिते-पाटलांनी केला.

बैलगाडा शर्यतीवरील सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळत बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे गावगाड्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार अधिकच रंगणार आहे. त्यामुळे बैलगाडा घाटात बैलांमागे शिक्षण सोडुन लहान वयातील मुलांची संख्या अधिक असल्याचे मोहिते -पाटलांनी बोलून दाखवत बैलगाडा मालकांना चांगलेच सुनावले आहे.

First published:
top videos

    Tags: Pune, Sangali