डेहराडून, 01 जून : जगभरात कोरोनाव्हासरविरोधातील लसीचं ट्रायल सुरू आहे. शिवाय वेगवेगळ्या औषधांचंही ट्रायल सुरू आहे. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो आहे. शिवाय शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही विविध उपाय सुचवले जात आहेत आणि अशीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आता उत्तराखंडच्या (uttarakhand) आयुष विभागाने (aayush) आयुष रक्षा किट तयार केलं आहे. आयुष रक्षा किट हे सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही तर कोरोनाविरोधात लढणाऱ्या कोरोना योद्धांसाठी आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी हे किट आहे. या कोरोना योद्धांसाठी आयुष कोरोना किट म्हणजे एकप्रकारे ढाल आहे. या आयुष रक्षा किटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी मदत मिळेल असा दावा आयुष विभागाने केला आहे. काय आहे या आयुष रक्षा किटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं या आयुष रक्षा किटमध्ये काय आहे ते पाहुयात. आयुष रक्षा काढा (पावडर) अश्वगंधा वटी (टॅबलेट) संशमनी वटी (टॅबलेट) हे वाचा - चीन नव्हे तर ‘या’ देशात जगातील कोरोनाचा पहिला रुग्ण; डॉक्टरांचा दावा असं पाहायला गेलं तर फक्त 3 वस्तू या आयुष रक्षा किटच्या पॅकेटमध्ये आहेत. मात्र एकूण 7 आयुर्वेदिक औषधांपासून ते तयार करण्यात आलं आहे. कसं वापरणार आयुष रक्षा किट? आयुष रक्षा काढ्याची 2 चमचे पावडर 2 कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी उकळून प्या. सकाळी आणि संध्याकाळी हा काढा प्यायचा आहे. अश्वगंधा वटी आणि संशमनी वटीची एक एक गोळी सकाळी कोमट पाण्यासह घ्यायची आहे. याचं नियमित सेवन केल्याने फक्त कोरोनाव्हायरसच नव्हे तर इतर व्हायरल आजारांविरोधातही लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, असा दावा केला आहे. हरिद्वारममधील ऋषिकुल महाविद्यालयाच्या फार्मसीमध्ये हे किट तयार करण्यात आलं आहे. आयुष विभाग कोरोना योद्धांना चार लाख रक्षा किट मोफत देणार आहे. हे वाचा - VIDEO: COVID 19 रुग्णांसाठी 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी पाहून व्हाल थक्क उत्तराखंडचे आयुष मंत्री हरक सिंह रावत यांनी सांगितल्यानुसार या आयुष रक्षा किटमध्ये 15 दिवस पुरेल इतकी सामग्री आहे. 15 दिवसांचा कोर्स करून रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. जोपर्यंत कोरोनाव्हायरसविरोधातील लस येत नाही तोपर्यंत आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा कोरोनापासून बचाव करण्याचा एक मार्ग आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.