वसीम अहमद, प्रातिनिधी अलिगड, 20 जुलै : आपण श्रावणबाळाची कथा ऐकलीच असेल. श्रावण आई-वडिलांना कावडीत बसवून कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता. आजच्या काळात असा श्रावणबाळ पाहायला मिळणं फार कठीण आहे. मात्र अशी अनेक मुलं असतात जी आपल्या पालकांना अत्यंत जीवापाड जपतात. उत्तर प्रदेशच्या अलिगडमधून श्रावणबाळाची आठवण करून देणारी एक घटना समोर आली आहे. तीन भावांनी कावड खांद्यावर घेऊन आई-वडिलांना बालेश्वर धाम मंदिरात शिवदर्शनास नेले. मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय बदन सिंह बघेल हे पत्नी अनार देवी यांच्यासह हाथरस येथील हरी नगर कॉलनीत राहतात. दोघंही अंध आहेत. त्यांना रमेश, विपीन आणि योगेश अशी तीन मुलं आहेत. या तिघांनीही राम घाटात गंगेच्या पाण्यात आंघोळ करून एका कावडीच्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी खाट बांधली आणि त्यावर एका बाजूला आईला, तर दुसऱ्या बाजूला वडिलांना बसवलं. तिन्ही मुलांनी कावड खांद्यावर घेतली आणि सासनीच्या बालेश्वर धाम मंदिरात दर्शनासाठी निघाले.
याबाबत विपीन म्हणाला, ‘चार दिवसांपासून आम्ही आई-वडिलांना घेऊन मंदिराकडे निघालो आहोत. दर 15 किलोमीटरवर आम्ही विश्रांतीसाठी थांबतो. मात्र कावडीत बसवूनच आई-वडिलांना मंदिरात घेऊन जाणार असा आम्ही निर्धार केला आहे. आमचं संपूर्ण कुटुंब आमच्यासोबत आहे. माझ्या मोठ्या आणि लहान भावाच्या पत्नीदेखील सोबत आहेत. मी एवढंच सांगेन की, सर्वांनी आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या, त्यांची श्रद्धेने सेवा करा.’ नाजूक कंबरपट्टा ते चांदीची चप्पल, नवरीसाठी खरेदी करा लेटेस्ट फॅशन! दरम्यान, दिवसाआड घरघुती भांडणांच्या घटना समोर येणाऱ्या आजच्या काळात अशी मुलं पाहायला मिळणं हे अत्यंत सुखद आहे. नेटकऱ्यांनीही या मुलांचं कौतुक केलं आहे.