अखिलेश सोनकर, प्रतिनिधी चित्रकूट, 18 जुलै : अधिक मास असल्याने यंदाचा श्रावण अतिशय खास मानला जातोय. महाराष्ट्रात आजपासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे. तर, उत्तर भारतात आपल्याआधी 4 जुलैलाच श्रवणाची सुरुवात झाली. तेथील विविध मंदिरांमध्ये दोन्ही श्रावणी सोमवारी भाविकांनी गर्दी केली होती. महादेवाला प्रिय असे विविध पदार्थ शिवलिंगावर अर्पण करण्यात आले. सर्वत्र प्रसन्न वातावरण होतं. अशातच एका मंदिरात मात्र जलाभिषेक करायला आलेल्या दोन भाविकांनी एकमेकांवर चक्क लोटाभिषेक केल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकांना एवढी मारहाण केली की, भांडण सोडवायला पोलीस मध्ये पडले. तर बघ्यांनी या भांडणांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. मध्यप्रदेशातील रामघाट मत्यगजेंद्रनाथ मंदिरात ही घटना घडली. दुसऱ्या श्रावणी सोमवारी सोमवती अमावस्येनिमित्त हजारो भाविक याठिकाणी दाखल झाले होते. रामघाटावरील मंदाकिनी नदीत आंघोळ करून भाविक मंदिरात दर्शनाला जात होते. मंदिराबाहेर सर्वजण प्रामाणिकपणे एका रांगेत उभे होते. अशातच एका भाविकाने मधूनच मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. त्याला रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी थांबवलं. मात्र त्याने थेट भांडणच सुरू केलं. दोन भाविकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. पुढे… https://youtu.be/NmXK96qYJiA हे भांडण एवढं टोकाला गेलं की, दोघांनी हातातल्या पाण्याने भरलेल्या जड बादल्या आणि तांबे एकमेकांना फेकून मारले. देवाच्या दारात दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. काही भाविक घटनेचा व्हिडिओ काढू लागले. मोठा गोंधळ झाल्यावर तिथे तैनात असलेले पोलीस आले आणि त्यांनी एकमेकांवर हल्ला करणाऱ्या या दोन भाविकांना एकमेकांपासून वेगळं केलं आणि जरा दूर घेऊन गेले.
पोलिसांनी दोघांवरही आवाज चढवला. सक्त ताकीद दिल्यानंतर वातावरण थोडं शांत झालं. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दरम्यान, याबाबात मंदिर समिती किंवा भाविकांपैकी कोणाकडूनही रीतसर तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.