मुंबई, 15 नोव्हेंबर : इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूब यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स केवळ शेअरिंगपुरतेच मर्यादित नाहीत, तर उत्पन्नाचे स्रोतही आहेत. प्रसिद्धी, लोकप्रियतेसोबतच पैसे मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबचा वापर केला जातो. यू-ट्यूबवर स्वतःचं चॅनेल सुरू करून त्यावर विविध विषयांवरचे व्हिडिओज अपलोड करून कोणीही पैसे मिळवू शकतं. कोरोना काळात अशा प्रकारे उत्पन्न मिळवण्याकडे अनेकांचा, विशेषतः तरुणाईचा कल जास्त वाढला होता. यू-ट्यूबर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे याला सेलेब्रिटी, राजकीय व्यक्तीदेखील अपवाद नाहीत. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरीदेखील यू-ट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावत आहेत. गडकरी यू-ट्यूबचा वापर नेमका कशासाठी करतात आणि त्यातून त्यांना उत्पन्न कसं मिळतं हे जाणून घेऊ या. इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूब हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता अनेकांसाठी कमाईचं साधन बनले आहेत. यू-ट्यूबवर चॅनेल सुरू करून व्हिडिओ अपलोड करणं, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स मिळवणं आणि त्यातून कमाई करणं हा फंडा तरुणाई अवलंबताना दिसत आहे. लोकप्रियता, प्रसिद्धी आणि कमाई अशा तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी यू-ट्यूबचा वापर केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील यू-ट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. हेही वाचा - अरेच्चा! हायवेवर ब्रीजखाली अडकलं चक्क विमान; पण रस्त्यावर आलं कसं Watch Video ‘मी यू-ट्यूबच्या माध्यमातून दरमहा चार लाख रुपये कमावतो. कारण कोरोना काळात माझ्या सबस्क्रायबर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यासाठी यू-ट्यूब मला रॉयल्टी म्हणून दरमहा चार लाख रुपये देतं. माझ्या भाषणांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येतील आणि त्या बदल्यात मला पैसेही मिळतील हा विचार मी कधीच केला नव्हता’, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एका माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर त्यांच्या भाषणांचा एक संग्रह आहे. यामध्ये पत्रकार परिषदा, चॅनेल्सना दिलेल्या मुलाखती, सार्वजनिक बैठका आणि लाइव्ह भाषणांचा समावेश आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सुमारे एका वर्षानंतर गडकरी यांनी हे चॅनेल सुरू केलं. 25 मार्च 2015 ला सुरू झालेल्या या चॅनेलला आतापर्यंत सुमारे चार कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या मुलाखतीत गडकरी यांना जेवण बनवण्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘कोरोना काळात मी एक शेफ बनलो होतो आणि घरीच जेवण बनवणं सुरू केलं होतं. मला जेवण बनवायला खूप आवडतं. लॉकडाउनच्या काळात मी जेवण बनवणं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लेक्चर देणं सुरू केलं. आंतरराष्ट्रीय संघटना आणि विद्यापीठांकडून मला भाषणासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. या भाषणांचे सर्व व्हिडिओ मी माझ्या यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड केले होते. आतापर्यंत मी माझ्या लेक्चर्सचे 950 हून अधिक व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केले आहेत’.