नवी दिल्ली 13 सप्टेंबर: देशात कोरोनावर औषध शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही लशींचं संशोधन प्रगतीपथावर आहे. 2021च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ही लस तयार होऊ शकते असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितलं. देशात तयार झालेल्या औषधाचा पहिली डोज घेण्याची आपली तयारी आहे असंही त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यात त्यांनी ही तयारी दर्शवली. त्यामुळे लोकांमध्ये औषधाविषयी असलेली भीती दूर होईल असंही ते म्हणाले.
भारतात Oxford-AstraZenecaच्या लशीच्या चाचण्या सीरमच्या मदतीने सुरू आहेत. सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादनही करणार आहे. तर Bharat Biotech च्या Covaxin आणि Zydus Cadilaच्या ZyCoV-D या लशींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आहेत.
कोरोनावरची लस 2021च्या पहिल्या तीन महिन्यात येऊ शकते असा अंदाजही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या लशींंचं काम प्रगतीपथावर असून त्यांना पाहिजे त्या सर्व परवानग्या तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असंही ते म्हणाले.
संसदेच्या अधिवेशनाला सोमवारपासून (14 सप्टेंबर) सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत 5 खासदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी होणार आहे.
राज्यात आत्तापर्यंत सर्वात जास्त 416 जणांचा मृत्यू, बरे होणाऱ्या दरातही घसरण
कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे. संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही Online पद्धतीनेच दिली जाणार आहेत.
COVID-19: मित्रांसोबत केली बेधुंद पार्टी, 9 लाखांचा दंड होताच नशाच उतरली
संसंद भवनाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला असून खासदारांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली देण्यात आली आहे. दोनही सभागृहांचं आतूनही सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus