Home /News /national /

तुर्कस्तानच्या ‘या’ मशिदीचा आपल्याशी काय संबंध? केरळच्या निवडणूक निकालांवर झाला मोठा परिणाम!

तुर्कस्तानच्या ‘या’ मशिदीचा आपल्याशी काय संबंध? केरळच्या निवडणूक निकालांवर झाला मोठा परिणाम!

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान (Turkey President Recep Tayyip Erdogan) यांनी जुलै महिन्यात एक निर्णय घेतला होता .त्यावेळी या निर्णयाचा केरळच्या स्थानिक निवडणुकांमध्ये (Kerala Local Body Election) मोठा परिणाम होईल अशी कुणीही कल्पना केली नसेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 डिसेंबर : तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष  रेसेप तैयब एर्दोगान (Turkey President Recep Tayyip Erdogan) यांनी जुलै महिन्यात एक निर्णय घेतला होता. त्यांच्या त्या निर्णयाला जगभरातून मोठा विरोध झाला. एर्दोगान यांनी जगभरातील जनमताची पर्वा न करता देशातील प्रसिद्ध हाया सोफिया (Hagia Sophia) म्युझियमचं मशिदीमध्ये रुपांतर केलं. त्यावेळी या निर्णयाचा हजारो किलोमीटर दूर केरळमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये (Kerala Local Body Election) मोठा परिणाम होईल अशी कुणीही कल्पना केली नसेल. काही जणांना हे वाचून आश्चर्य वाटेल, पण जुलै महिन्यात तुर्कस्तानमध्ये घेण्यात आलेल्या या निर्णयाचा केरळच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला आहे. एर्दोगनच्या निर्णयानंतर केरळमध्ये काय झाले? तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या निर्णयाचं केरळ मुस्लीम लीग या पक्षाने स्वागत केले. या पक्षाचे नेते अली शिहाब यांनी या निर्णयाला पाठिंबा देणारा एक लेख लिहिला. केरळ मुस्लीम लीग हा ‘युनायटेड डेमॉक्रॅटीक फ्रंट’चा (UDF) घटकपक्ष आहे. राज्यात सध्या विरोधी पक्षामध्ये असलेल्या या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे. अली शिहाब यांच्या लेखावर सत्तारुढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जोरदार टीका केली. ‘आता मुस्लीम लीग कोणत्या आधारावर अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या भाजपच्या निर्णयाचा विरोध करेल? त्या जागेवर यापूर्वी मशिद होती ती पाडून आता मंदिर उभारले जात आहे’ असा प्रश्न पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कोडियारी बालकृष्णन यांनी फेसबुक पोस्टद्वारे विचारला. ‘काँग्रेसची भूमिका काय?’ बालकृष्णन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काँग्रेसला टार्गेट केले. ‘जमात-ए-इस्लामी ही संघटनेनं तुर्कस्तान सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर मुस्लीम लीगच्या नेत्यानंही म्युझियमचे रुपांतर मशिदीमध्ये करण्याच्या निर्णयाचं उघड स्वागत केले आहे. काँग्रेसनं जमात-ए-इस्लामी संघटनेची राजकीय शाखा असलेल्या वेलफेअर पार्टीशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) ची राजकीय शाखा असलेल्या एसडीपीआयसोबतही काँग्रेसचा आघाडीचा विचार आहे. त्यामुळे तुर्कस्तानच्या या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका काय आहे?’ हा प्रश्न त्यांनी विचारला. चर्चने केला होता विरोध केरळमध्ये मोठा प्रभाव असलेल्या कॅथलिक चर्चनेही तुर्कस्तान सरकारच्या निर्यणाचा जोरदार विरोध केला. ‘मुस्लीम लीगच्या नेत्यांनी इतिहासाचं वाचन करावे’ असा सल्ला चर्चने दिला. विशेष म्हणजे केरळच्या राजकारणात चर्चची भूमिका ही आजवर काँग्रेसच्या सोयीची राहिलेली आहे. चर्चने स्थानिक निवडणुकांपूर्वी भूमिका बदलली. त्याचा मोठा परिणाम निवडणूक निकालांवर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विजयात झाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Election, Kerala, Turky

    पुढील बातम्या