नवी दिल्ली, 05 जानेवारी: वेगवेगळ्या कारणांमुळे भारतातील अनेक शाळांमध्ये मुलींचं प्रमाण कमी असतं. कधी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मुली नोकरी करतात, बालमजुरी करतात किंवा ‘स्रीच्या जाती’ला कशासाठी हवं शिक्षण असा समज बाळगून आईवडील त्यांना शाळेत पाठवत नाहीत. आसाममध्येही हीच समस्या आहे. दरम्यान यावर उपाय म्हणून तिथल्या सरकारने एक शक्कल लढवली आहे. शाळेत वर्गात बसल्याबद्दल मुलींना दररोज 100 रुपये देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे. जानेवारी 2021 च्या शेवटापर्यंत प्रत्यक्ष दररोज 100 रुपये द्यायला सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं. दुचाकी वाहनांचं वितरण आसाम सरकारच्या प्रज्ञान भारती योजनेअंतर्गत 12 वीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना 22 हजार दुचाकी वाहनं देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 144.30 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. ज्या विद्यार्थिनींना 12 वी बोर्डाच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवला आहे त्यांना सरकार दुचाकी देणार आहे. मग अशा विद्यार्थिनींची संख्या एक लाखाहून अधिक असली तरीही दुचाकी दिल्या जातील, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं. 2018,19 मध्ये ज्या विद्यार्थिनींना 12 वी बोर्डाच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवला आहे त्यांनाही सरकार दुचाकी देणार आहे. विद्यार्थिनींच्या खात्यांत जमा होणार 2000 शिक्षणमंत्री म्हणाले की, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या बँक खात्यांत जानेवारीअखेर पर्यंत अनुक्रमे 1,500 रुपये व 2,000 रुपये जमा केले जातील. शैक्षणिक पुस्तकं आणि अभ्यासाच्या इतर साहित्यासाठी हे पैसे त्यांना वापरता येतील. ही योजना गेल्यावर्षीच सुरू करायची होती पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलावी लागली असंही त्यांनी स्पष्ट केलं. (हे वाचा- ऑरगॅनिक शेती करुन शेतकऱ्याने मिळवलं लाखोंचं उत्पन्न) या वर्षी आसाममध्ये विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे सरकार मतदारांना आणि नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे असंही म्हणता येईल. पण चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या चिमुरड्यांना शाळेत गेल्यामुळेच पैसे मिळायला लागले तर त्या शाळेत येऊन बसतील तरी अशीही एक आशा आहे. यामुळे आर्थिक नुकसान होत नसल्याने कुटंबीयही हसत हसत मुलींना शाळेत पाठवतील, अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.