नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : 2004 च्या त्सुनामीत
(Tsunami) आई-वडील गमावलेल्या एका मुलीचं नुकतंच लग्न झालं. तिचं कन्यादान तमिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन
(Tamilnadu health Secretary J Radhakrishnan) यांनी केलं. ही बातमी समोर येताच जे. राधाकृष्णन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महत्त्वाचं म्हणजे ते या मुलीचं 2004 सालापासून पालनपोषण करत होते. 26 डिसेंबर 2004 रोजी त्सुनामीने तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात हाहाकार माजवला होता. या त्सुनामीत हजारो नागरिकांचा जीव गेला, तर अनेक जण बेघर झाले आणि अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या. याच घटनेत सौम्या नावाच्या या मुलीनेही आपले आई-वडील गमावले होते.
या त्सुनामीमुळे नागापट्टिणम जिल्हा राज्यात सर्वांत जास्त प्रभावित झाला होता. तिथेच राहणारी सौम्या तेव्हा पाच वर्षांची होती. तिने तिचे पालक त्यात गमावले. सौम्या ही वेलांकनी येथे ढिगाऱ्याखाली सापडली होती. या त्सुनामीत शेकडो मुलं अनाथ झाली. त्यामुळे राज्य सरकारने वेलीपलायमजवळ मुलांसाठी अन्नाई सत्य गव्हर्न्मेंट होम नावाचं बालगृह सुरू केलं. त्यानंतर तिथे अनेक अनाथ
(Orphan) मुलांना दाखल करण्यात आलं. सौम्यालाही तिथेच आश्रय मिळाला आणि ती राधाकृष्णन यांच्या पालकत्वाखाली लहानाची मोठी झाली. या संदर्भातलं वृत्त 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'ने वृत्त दिलं आहे.
त्या अनाथाश्रमाच्या शिक्षिका आणि प्रभारी अधीक्षक एम. गिरिजा म्हणाल्या, "राधाकृष्णन सर जेव्हाही नागापट्टिनणमला जायचे तेव्हा ते या मुलांना भेटण्यासाठी बालगृहात थांबायचे. त्सुनामीमुळे अनाथ झालेली सर्व मुलं आता मोठी झाली आहेत. अनेक जण इथून निघून गेले. काहींचं लग्न झालं तर काही अजूनही शिकत आहेत."
सौम्यानेही पुढच्या शिक्षणासाठी
(Education) हे बालगृह सोडलं. तिने एडीएम कॉलेज फॉर वुमनमध्ये अर्थशास्त्रात
(BA in Economics) बीए केलं. यासाठी तिला बालकल्याण समितीचे सदस्य मलारविझी आणि दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सुरियाकला यांनी सहकार्य केलं. आता 22 वर्षांची असलेल्या सौम्याने रविवारी तिरुपूर इथले टेक्निशिअन के. सुभाष यांच्याशी लग्न केलं. या लग्नात राधाकृष्णन आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले. राधाकृष्णन यांनी सौम्याचं कन्यादान करून मंगळसूत्र भेट म्हणून दिलं. यावेळी आरोग्य सचिव राधाकृष्णन यांनी सौम्याच्या काही आठवणीही सांगितल्या.
"सौम्या ही केवळ आमची मुलगीच नाही तर नागपट्टिणम जिल्ह्याचीही मुलगी आहे. तिचं लग्न झाल्याचे पाहून मी खूप आनंदी आणि भावूक झालो आहे," असं राधाकृष्णन यांनी म्हटलं. त्या वेळी जिल्हाधिकारी ए. अरुण थंबुराज आणि एसपी जी. जवाहर हेदेखील उपस्थित होते आणि त्यांनी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
तमिळनाडूचे आरोग्य सचिव यांनी सौम्याचं कन्यादान केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, त्यांचं कौतुक होतं आहे. एका अनाथ मुलीला वाढवून, तिचं कन्यादान करून त्यांनी आदर्श घालून दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.