चेन्नई, 26 डिसेंबर : अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू डियागो मॅरडोना (Diego Maradona) यांचं नोव्हेंबर महिन्यात धक्कादायक निधन झालं. विसाव्या शतकातील महान फुटबॉलपटू म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. मॅराडोनाचा चाहता नाही असा देश जगात सापडणं हे अवघड आहे. देश, वेष, वंश, भाषा, धर्म या सर्वांच्या भिंती तोडून मॅराडोनाचा विषय निघाला की त्याचे फॅन्स भरभरुन बोलतात. मॅराडोना यांच्या आठवणी जपण्यासाठी तयार करण्यात आलेला एक केक मात्र सध्या वादात सापडला आहे.
तामिळनाडू (Tamil Nadu) मधील रामनाथपूरममधील एका बेकरीच्या बाहेर मॅराडोनासारखा दिसणारा केक (Diego Maradona Cake) तयार करण्यात आला आहे. मॅराडोनातच्या शरिराराचा आकाराचा हा केक बेकरीच्या बाहेर सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला असून सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. हा केक पाहून फॅन्सच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
फॅन्स का नाराज आहेत?
या केकची उंची मॅराडोनापेक्षा जास्त आहे, असा काहींचा आक्षेप आहे. मॅराडोना 5 फुट 5 इंच उंच होते. हा केक 6 फुट उंच आहे. तर काही फॅन्सनी हा केक मॅराडोनांच्या चेहऱ्यासारखा दिसत नाही असा आक्षेप घेतला आहे. तर अनेक फॅन्सनी हा केक खाण्यासाठी कापायला विरोध केला आहे.
मॅराडोना नावाचे वादळ!
मॅराडोना यांची 21 वर्षांची फुटबॉल कारकीर्द चांगलीच वादळी ठरली होती. त्यांनी 1986 चा वर्ल्ड अर्जेंटीनाला जिंकून दिला होता. त्या ‘वर्ल्ड कप’ मध्ये इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी मॅरडोना यांनी केलेला गोल एक गोल चांगलाच वादग्रस्त ठरला होता. तो गोल आजही 'हॅण्ड ऑफ गॉड' या नावाने प्रसिध्द आहे. या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ नंतर काही मिनिटांममध्येच त्यांनी इंग्लंडच्या संपूर्ण टीमला चकवत एक अविस्मरणीय गोल केला होता. मॅराडोना यांचा तो गोल विसाव्या शतकातील सर्वोत्तम गोलपैकी एक मानला जातो.
(हे वाचा-IND vs AUS: मेलबर्न टेस्टपूर्वी महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली)
मॅराडोना यांच्या कारकिर्दीला त्यानंतरच्या काळात अंमली पदार्थ सेवनाचं ग्रहण लागलं. याच कारणामुळे ते 1994 च्या वर्ल्ड कपमधून निलंबित झाले. त्यांच्या जगभरातील फॅन्सवर याचा काहीही परिणाम झाला नाही. सर्व प्रकारच्या वादग्रस्त घटनांनतरही मॅराडोनी यांची लोकप्रियता कायम होती. मॅराडोना काही वर्षांपूर्वी कोलकातामध्ये आले होते, तेंव्हा त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.