दिल्ली, 27 मार्च : प्रभावी वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर भारतीय राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या स्मृती आजही भारतीयांच्या मनात कायम आहेत. माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज यांनी नुकताच राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांना कायदे विषयात 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून, त्या सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.
बासुरी स्वराज यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली युनिटच्या लीगल सेलच्या सह-संयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बासुरी यांचे अभिनंदन करताना पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी स्वराज यांची नियुक्ती लगेचच लागू झाली असल्याचं सांगितलं. तसंच त्या भाजपच्या विस्तारात मोलाची मदत करतील अशी अपेक्षा सचदेव यांनी व्यक्त केली.
बासुरी स्वराज यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचेही आभार मानले आहेत. त्या ट्विटमध्ये लिहितात, `मला भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली राज्य लीगल सेलची सह-संयोजक म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, बी.एल. संतोष, वीरेंद्र सचदेव आणि दिल्ली भाजपची आभारी आहे.`
CBIची टीम दारात, अधिकाऱ्याने इमारतीतून मारली उडी; 1 कोटीची बॅग फेकली, VIDEO VIRAL
`यापूर्वी कायदेशीर समस्यांमध्ये मी पक्षाला मदत केली होती. आता मला दिल्ली भाजपच्या कायदेशीर विभागाची सह-संयोजक म्हणून अधिकृतपणे पक्षाची अधिक सक्रियपणे सेवा करण्याची संधी मिळाली आहे,` असं बासुरी यांनी सांगितलं.
बासुरी स्वराज यांना कायदे क्षेत्रातला 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून त्या सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. 2007मध्ये बासुरी यांनी दिल्लीच्या बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. त्यांनी वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवण्यासाठी लंडनमधल्या बीपीपी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. लॉमध्ये बॅरिस्टर म्हणून पात्र ठरल्यावर त्यांना लंडनमधल्या इनर टेम्पलमधून बारमध्ये पाचारण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट, रिअल इस्टेट, टॅक्सेस, आंतरराष्ट्रीय व्यवसाय लवाद आणि अनेक गुन्हेगारी खटले हाताळले आहेत. त्या खासगी प्रॅक्टिस करतात. तसंच त्यांची हरियाणा राज्याच्या अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात बासुरी स्वराज यांची राजकीय वाटचाल नेमकी कशी असेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Politics, Sushma swaraj