कुंदन कुमार, प्रतिनिधी गया, 20 जून : आज जवळपास प्रत्येकाकडे घड्याळ असतं. काहीजणांच्या मनगटावर तर स्मार्टवॉचदेखील दिसतात, जे केवळ वेळ नाही, तर एखाद्याच्या हृदयाचे ठोकेसुद्धा सांगतात. या घड्याळात मोबाईलचे फिचरदेखील असतात. परंतु वेळ इतकी पुढे गेलेली असली तरी बिहारच्या गया जिल्ह्यात मात्र आजही सूर्याच्या दिशेवरून वेळ मोजली जाते. होय, अगदी आपले आजी-आजोबा मोजायचे तसंच. सूर्य अगदी डोक्यावर आला की समजून जायचं. दुपारचे 12 वाजले, कडक ऊन पडलं. परंतु बिहारमध्ये माणसं हा असा अंदाज लावत नाहीत, तर स्वतः घड्याळच अशाप्रकारे वेळ सांगते. बिहारच्या गया जिल्ह्यातील विष्णूपद मंदिरात 164 वर्षांपूर्वीचं घड्याळ आहे. पंडित छोटेलाल भइया यांनी या घड्याळाची स्थापना केली होती. कोणतीही बॅटरी किंवा काटे नसताना हे घड्याळ अचूक वेळ दर्शवते. या घड्याळात वेळ पाहूनच मंदिरात भगवान विष्णूला नैवद्य दाखवलं जातं.
जमिनीपासून तीन फुटांच्या उंचीवर गोलाकारात असलेल्या या घड्याळावर धातू बसवण्यात आले असून त्यावर क्रमांक लिहिलेले आहेत. जसा सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेकडे जातो त्याचप्रमाणे त्याची सावली या घड्याळावर पूर्वेकडून पश्चिमेला जाते. त्यानुसार घड्याळ अचूक वेळ दर्शवते. म्हणूनच सूर्यास्तानंतर चंद्राच्या सावलीत हे घड्याळही शांत होतं म्हणजेच काम करणं थांबवतं. IRCTC: चार धाम यात्रेला जायचंय? आयआरसीटीसीने आणलंय खास पॅकेज, पाहा कधी होतंय सुरु मागील पितृपक्षात जत्रेदरम्यान या घड्याळावरील धातूच्या भागाला तडा गेला होता. त्यानंतर मोठ्या मेहनतीने तज्ज्ञांकडून ते दुरुस्त करून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे भक्त मंदिरात भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर या घड्याळाचीही पूजा करतात. त्यावर फूलं चढवतात. मात्र आता घड्याळाला काचेने बंदिस्त करण्यात आलं आहे. जेणेकरून त्यात कोणताही बिघाड होऊ नये आणि ते पुढेही वर्षानुवर्षे चांगल्या स्थितीत राहावं.