जयपूर, 22 मार्च: रविवारी राजस्थानात तुफानी वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या वादळाचा राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. सुसाट वारा आणि जोरदार पावसामुळे शेतीचं (massive crops damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तुफान वादळामुळे बाडमेर, जैसलमेरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं एका झटक्यात होत्याचं नव्हत झालं आहे. त्यामुळे वादळग्रस्त जिल्ह्यांत राहणारा शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कृषीमंत्री कैलाश चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.
कृषीमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी रिपोर्ट तयार करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. यावेळी ते म्हणाले की, वादळ आणि जोरदार पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहचवली जाईल. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानतील बरीच शहरं वादळ आणि अवकाळी पावसा सारख्या संकटाला तोंड देत आहेत.
पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असं असताना रविवारी चंदन गावच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रविवारी आलेल्या वादळाने त्याच्या पिकाचं प्रचंड नुकसान केलं होतं. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित पीडित शेतकऱ्याचं नाव अली शेर खान असून त्याने कीटकनाशकं पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर संबंधित शेतकऱ्याची प्रकृती अचानक खालावली त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात दाखल केलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा-Weather Alert: 4 जिल्ह्यांसाठी पुढचे 3 तास धोक्याचे! वादळी पावसाबरोबर पडणार गारा
राज्याचे कृषिमंत्री लालचंद कटारिया यांनी पीक नुकसानी बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. तसेच त्यांनी पीडित शेतकऱ्यांशी फोनवरुन संपर्क करून त्याच्या झालेल्या नुकसानीची माहिती करून घेतली आहे. वादळानंतर आता कृषी विभाग आणि महसूल विभागानं शेतकर्यांचं किती नुकसान झालं, याची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. त्याच बरोबर विमा कंपनीच्या एका टीमलाही पाहणी करण्यासाठी पाठवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.