वाईट! दुबईहून भारतात पोहोचला मुलाचा मृतदेह; आईवडिलांच्या ताब्यात न देताच पाठवला परत

वाईट! दुबईहून भारतात पोहोचला मुलाचा मृतदेह; आईवडिलांच्या ताब्यात न देताच पाठवला परत

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुलाच्या मृतदेहाला आणण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना रिकाम्या हाती परत यावं लागलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभर हाहाकार माजला आहे. या काळात अनेक कठीण प्रसंग लोकांसमोर उभा राहत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. कोरोनाला रोखण्यात याचा फायदा होत असला तरी असेही अनेक प्रकार समोर येत आहेत ज्यामुळे माणसांच्या नात्यांवरही परिणाम होताना दिसतोय. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुलाच्या मृतदेहाला आणण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना रिकाम्या हाती परत यावं लागलं. मृतदेह विमानतळावर येऊनही त्यांना मृतदेह ताब्यात मिळाला नाही. इतकंच काय त्याचं तोंडही बघायला मिळालं नाही.

टिहरी गढवालमधील सेमवाल गावात राहणारा कमलेश भट्ट हा 25 वर्षांचा तरुण दुबईतील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. 16 एप्रिलला त्याचा कार्डियाक अॅरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी कमलेशचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी करत होते. दुबईतील एका व्यक्तीच्या सहकार्यामुळे गुरुवारी कमलेशचा मृतदेह भारतात पाठवण्यात आला. पण दिल्ली विमानतळावर मृतदेह आल्यानंतर विमान दीड तासाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा तसंच परत गेलं.

दिल्ली विमानतळावर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कमलेशचे वडील हरिप्रसाद भट्ट आणि इतर नातेवाईक गेले होते. मात्र त्यांच्याकडे मृतदेह सोपवला नाही. कमलेशचा भाऊ विमलेशने सांगितलं की, विमानतळावर इमीग्रेशनचे नोडल अधिकारी नसल्यानं इतर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विमानातून मृतदेह काढण्यास नकार दिला. त्यामुळे मृतदेह पुन्हा दुबईला पाठवण्यात आला.

इटीव्ही भारत या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, मृतदेह भारतात आणल्यानंतर परत पाठवण्यात आला. गृहमंत्रालयाच्या नव्या गाइडलाइननुसार हा निर्णय घेतला गेल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.  कमलेशच्या कुटुंबियांनी म्हटलं की, जर भारतीय दुतावासाने परवानगी दिली तर भारत सरकारकडून पुन्हा त्यावर निर्बंध कसे टाकता येतील असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

हे वाचा : कोरोना वॅस्किनची मानवी चाचणी, पहिल्यांदा लस टोचून घेणारी एलिसा काय म्हणाली?

मुलाचा मृतदेह विमानतळावर येऊन पुन्हा दुबईला गेल्यानं कुटुंबियांना धक्का बसला आहे. आई वडिलांना मुलाचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. दरम्यान, एसडीएम धनोल्टी रविंद्र जुवांठा यांनी सांगितलं की, तरुणाचा मृतदेह आणण्यासाठी नातेवाईकांनी दिल्लीचा पास तयार केला होता. तर कमलेशच्या कुटुबियांनी याप्रकरणी डीएमला पत्र लिहून मृतदेह भारतात आणण्याची मागणी केली आहे. यानंतर प्रशासनाने गृह विभागाला पत्र पाठवून संपूर्ण प्रकारणाची माहिती दिली आहे.

हे वाचा : कोरोनामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आई वडील शेवटचं पाहू शकले नाही

मृतदेह दिल्ली विमानतळावरून पुन्हा दुबईला का नेला याची चौकशी केली जात आहे. दरम्यान तरुणाचा मृतदेह भारतात आणल्यानंतर परत दुबईला नेला याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. दुसरीकडे कुटुंबियांकडून कमलेशचा मृतदेह पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हे वाचा : एका दिवसात 1258 लोकांचा मृत्यू, तरी अमेरिकेसाठी का आहे ही दिलासादायक बातमी?

संकलन, संपादन - सूरज यादव

First published: April 25, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या