नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : आपल्या मुलीचं मोठ्या घरात लग्न व्हावं, तिला चांगला नवरा मिळावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मुलाकडून केल्या जाणाऱ्या सगळ्या मागण्या मान्य करून मुलीचं लग्न करून दिलं जातं. जावयाला देवाच्या स्थानी मानून त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते. अनेकदा जावई, तसंच मुलीच्या सासरची मंडळी पैशासाठी मुलीचा छळ करतात. त्यातून मग आत्महत्येच्या किंवा हुंडाबळीच्या घटनाही घडतात. एखाद्या कुटुंबात एक किंवा अनेक मुलीच असतील तर सासरच्या संपत्तीवर आपलाच हक्क असल्याचं जावई (Son in Law) गृहीत धरतात; मात्र अशा लोभी जावयांना धडा शिकवणारा निर्णय केरळ उच्च न्यायालयानं (Kerala High Court) दिला आहे.
'अमर उजाला'ने दिलेल्या वृत्तानुसार, सासऱ्याच्या मालमत्तेवर जावयाचा कायदेशीर अधिकार नाही. जावई सासरच्या मालमत्तेत किंवा इमारतीत हक्क सांगू शकत नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. केरळमधील कन्नूर (Kannur) इथल्या तैलीपरंबा गावाचे रहिवासी असलेल्या डेव्हिस राफेल (Davis Rafal) यांनी त्यांचे सासरे (Father In Law) हेंड्री थॉमस (Hendry Thomas) यांच्या संपत्तीवर दावा केला होता. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. अनिल कुमार यांनी डेव्हिस राफेल यांचा हा दावा फेटाळून, जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं.
रस्ते अपघातातील जखमीला रुग्णालयात पोहोचवा आणि 5000 रुपये मिळवा
याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे, की हेंड्री थॉमस यांना फादर जेम्स नाझरेथ (Father James Nazreth) आणि सेंट पॉल चर्चकडून (Sent Paul Church) भेट म्हणून काही जागा मिळाली आहे. त्यावर त्यांनी स्वतःच्या पैशांनी पक्कं घर (House) बांधलं आहे आणि तिथं ते आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या एकुलत्या एक मुलीशी डेव्हिस यांचं लग्न झालं आहे. त्यामुळं हेंड्री थॉमस यांच्या मालमत्तेवर आपलाही हक्क असल्याचा दावा डेव्हिस यांनी केला आहे. चर्चच्या अधिकाऱ्यांनी दानपत्राद्वारे ही मालमत्ता हेंड्री यांच्या कुटुंबाला दिली आहे आणि आपण हेंड्री यांच्या एकुलत्या एका मुलीशी लग्न केलं असून लग्नानंतर या कुटुंबाने एक प्रकारे आपल्याला दत्तकच घेतलं आहे. त्यामुळे त्या घरावर आणि मालमत्तेवर आपलाही अधिकार असल्याचा युक्तिवाद डेव्हिस यांनी केला आहे; मात्र आपल्याला ही जागा फादर जेम्स नाझरेथ आणि सेंट पॉल चर्चकडून भेट म्हणून मिळाली असली, तरी त्यावर स्वतःच्या पैशांनी घर बांधलं आहे. त्यावर आपल्या जावयाचा काहीही अधिकार नाही, असं हेंड्री थॉमस यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार नसल्याचा निर्णय कोर्टाने दिला.
एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं एकाच वेळी दोन तरुणींसोबत लग्न
या प्रकरणी हेंड्री थॉमस यांनी पाययन्नूर इथल्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करून, आपला जावई आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण करत असून, त्याच्यावर कारवाई करावी आणि आपल्याला आपल्या घरात शांतपणे जगू द्यावे अशी मागणी केली होती. त्यावर कनिष्ठ न्यायालयानंही डेव्हिस यांचा हेंड्रींच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं.
उच्च न्यायालयानंही कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निर्णय कायम ठेवून, जावयाचा दावा फेटाळून लावला. जावई कुटुंबातला सदस्य आहे का हे सांगणं कठीण आहे. हेंड्रीच्या मुलीशी लग्न केल्यानं त्याला एक प्रकारे कुटुंबाने दत्तक घेतल्याचा दावा जावयानं करणं हे लाजिरवाणं असल्याची टिप्पणीही उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.