चमोली, 8 फेब्रुवारी : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमनदी तुटून झालेल्या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मदतकार्य अजूनही सुरू आहे. राज्य आपत्ती निवारण दलाच्या (SDRF) जवानांबरोबरच इंडो-तिबेट पोलीस (ITBP) दलातील जवानही मदतकार्यात सहभागी आहेत. दरम्यान, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी (Wadia Institute of Himalayan Geology) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक शंका व्यक्त केली आहे. रेणी क्षेत्रात हिमस्खलनासह हिमनदी (Glacier) तुटल्यामुळेच ही दुर्घटना घडली असावी; मात्र या आपत्तीचं नेमकं कारण सखोल वैज्ञानिकांच्या विश्लेषणानंतरच स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. राय यांनी सांगितलं, की चमोली (Chamoli) जिल्ह्याच्या नीती घाटीमधील जे क्षेत्र दुर्घटनाग्रस्त झालं आहे, त्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांत पावसासह मोठ्या प्रमाणात हिमवर्षावही झाला होता. त्यामुळे वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फ जमा झाला. संस्थेच्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की तापमान कमी झाल्यावर ग्लेशियर (हिमनदी) घट्ट झाली. त्यामुळे अशी शक्यता आहे, की ज्या क्षेत्रात आपत्ती घडली, तेथे धूप झाल्यामुळे (Erosion) वरचा भाग बर्फ आणि मलब्यासह वेगाने खाली पडला असावा.
हे ही वाचा-WeTransfer च्या माध्यमातून सुरू होतं पॉर्न व्हिडिओ रॅकेट; आणखी एकाला अटक
वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालय जिऑलॉजी या संस्थेच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की उत्तराखंड राज्यातील बहुतांश हिमनद्या अल्पाइन हिमनद्या (Glacier) आहेत. या ग्लेशियर्स स्नो अॅव्हलाँच म्हणजेच हिमकडा घसरण्याच्या आणि तुटण्याच्या, स्खलन होण्याच्या दृष्टीने खूप धोकादायक आहेत. अधिक थंडीच्या मोसमात पर्वतीय क्षेत्रात होणारा पाऊस आणि हिमवर्षाव यांमुळे अल्पाइन ग्लेशियरवर काही लाख टन एवढा बर्फ साठतो. त्यामुळे हिमनदीत स्खलन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात नंदादेवी ग्लेशियरच्या एका भागाचे स्खलन झाल्यामुळे आलेल्या मोठ्या पुराच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञांच्या दोन टीम्स जोशीमठ-तपोवन येथे जातील. संस्थेचे संचालक कलाचंद सैन यांनी ही माहिती दिली. या तज्ज्ञांना ग्लेशियॉलॉजिस्ट असं म्हणतात. एका टीममध्ये दोन, तर दुसऱ्या टीममध्ये तीन सदस्य आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.