नवी दिल्ली 17 जानेवारी : महाराष्ट्रात दोनपेक्षा अधिक अपत्यं असतील तर नोकरीवर गदा येऊ शकते. पण सिक्कीम राज्यातील सरकारनं वेगळाच निर्णय घेतलाय. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी जास्त मुले जन्माला घालणाऱ्या महिलेला वेतनवाढ देण्याची घोषणा केलीय. अशी योजना राबवणारं भारतातील सिक्कीम हे पहिलं राज्य आहे. सध्या सिक्कीमची अंदाजे लोकसंख्या सात लाखांपेक्षा कमी आहे, त्यापैकी सुमारे 80 टक्के वांशिक समुदाय आहेत. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
सिक्कीममध्ये जी महिला जास्त मुलांना जन्म देईल, त्यांना सरकार मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री तमांग यांनी ही घोषणा केलीय. त्यांनी म्हटलं आहे की, ‘जे वांशिक समुदाय जास्त मुलं जन्माला घालतात, त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जाईल.’
तमांग रविवारी (15 जानेवारी 2023) दक्षिण सिक्कीममधील जोरथांग शहरात माघ संक्रांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
हे ही वाचा : वंचितला मविआमध्ये येण्याचा मार्ग मोकळा, अजितदादांनी सांगितला फॉर्म्युला
ते म्हणाले की, ‘सिक्कीमच्या प्रजनन दरानं अलीकडच्या काही वर्षांत प्रतिस्त्री एक बाळ अशी सर्वांत कमी वाढ नोंदवल्यामुळे वांशिक समुदायांची लोकसंख्या कमी झाली आहे.’ या वेळी तमांग यांनी सिक्कीममध्ये एखाद्या महिलेला एकच मूल असावं, व तिचं कुटुंब लहान असावं, यासाठी दबाव आणल्याबद्दल पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील या पूर्वीच्या सरकारवरसुद्धा टीका केली.
तर मिळणार वेतनवाढ
तमांग म्हणाले, ‘आता राज्यात महिलांसह स्थानिक लोकांना अधिक मुलं होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी विविध योजना सादर करून घटत्या प्रजननदराला रोखण्याची गरज आहे. आमच्या सरकारनं नोकरीला असलेल्या महिलांना आधीच 365 दिवसांची प्रसूती रजा आणि पुरुष कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची पितृत्व रजा दिली आहे. या शिवाय महिला कर्मचाऱ्यांना दुसऱ्या अपत्यासाठी एक आणि तिसऱ्या अपत्यासाठी दोन वेतनवाढी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं ठेवला आहे. एकापेक्षा जास्त मुलांना जन्म देण्याऱ्या योजनांसाठी नोकरीला नसणाऱ्या म्हणजेच सामान्य महिलाही आर्थिक मदतीसाठी पात्र असतील. याबाबतचा तपशील आरोग्य आणि महिला आणि बाल संगोपन विभागांद्वारे तयार केला जाईल.’
आयव्हीएफसाठी ही मिळणार मदत
मुख्यमंत्री तमांग म्हणाले की, ‘ज्या महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणेमध्ये समस्या आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं सिक्कीमच्या रुग्णालयांमध्ये आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) सुविधा सुरू केली आहे. या प्रक्रियेतून मुलांना जन्म देणाऱ्या सर्व मातांना तीन लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. आतापर्यंत 38 महिलांनी आयव्हीएफ सुविधेचा लाभ घेतला आहे.’
हे ही वाचा : कपडे बॅगेत भरून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, आज होणार चौकशी
दरम्यान, लोकसंख्या वाढीमुळे एकीकडे ‘हम दो हमारे दो...’ यासाठी देशातील बहुतांश भागात आग्रह धरला जात असताना सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा चांगलीच चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chief minister, Sikkim