नवी दिल्ली, 26 मार्च: एनकाउंटर स्पेशलिस्ट (Encounter Specialist) म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काही पुरुष ऑफिसर्सचा चेहरा उभा राहतो. मात्र या यादीमध्ये आता एका महिला पोलीस उप निरिक्षकांचंही (Police Sub Inspector) नाव जोडलं गेलं आहे. दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक प्रियंका (SI Priyanka) या एनकाउंटरचा भाग म्हणून काम करणारी पहिली महिला कर्मचारी ठरली. पोलिसांनी दावा केला आहे की या कारवाईतून त्यांनी एका कुख्यात गुंडाला आणि त्याची साथीदाराला अटक केली आहे. या चकमकीत दोन्हीही गँगस्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या पायाला जखम झाली होती. दरम्यान RML रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रगती मैदान याठिकाणी ही चकमक झाली आणि रोहित चौधरी (35) याला अटक करण्यात आली. रोहितला पकडण्यासाठी 3.5 लाखाचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. तर त्याचा साथीदार टिटू याच्या मुसक्या देखील पोलिसांनी आवळल्या. टिटूवर देखील 2 लाखाचं बक्षीस होतं.
एककाउंटरचा थरार
दिल्ली पोलिसांनी असा दावा केला आहे, अशाप्रकारे एनकाउंटरचा भाग असणाऱ्या प्रियांका या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी आहे. या चकमकीमध्ये प्रियांका यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं, त्यांच्या जॅकेटवर एक गोळी झाडण्यात आली होती. तर आरोपींनी दुसरा निशाणा एसीपी पंकज यांच्यावर केला होता. बुलेटप्रुफ जॅकेट असल्यामुळे प्रियांका आणि पंकज यांचा जीव थोडक्यात बचावला.
(हे वाचा-अग्नितांडवात दोघांनी गमावला जीव, भांडूपच्या मॉलमधील थराराचे भीषण VIDEO)
अतिरिक्त पोलीस आयुक्त (क्राइम) शिबेश सिंग यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की, अगदी सुरुवातीपासूनच प्रियांका या मोहिमेतील टीमचा एक महत्त्वाचा भाग होत्या. आरोपींना ट्रॅक करण्याच्या टीमचा त्या एक महत्त्वाचा भाग होत्या.
2008 साली प्रियांका दिल्ली पोलिसांत भरती झाल्या होत्या. तर गेल्या दोन वर्षांपासून त्या क्राइम ब्रँचमध्ये काम करत आहेत. या यूनिटमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांची पोस्टिंग जिल्हा यूनिटमध्ये झाली होती. प्रियांका यांच्या धडक कारवाईबाबत सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Delhi, Delhi News, Police Encounter