मुंबई, 26 मार्च: संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र कोरोनाच्या (Coronavirus) संकटाशी लढा देत असताना, गुरुवारी रात्री मुंबईतील भांडूप परिसरात एका भयावह संकटाचा सामना भांडूपकरांना करावा लागला. याठिकाणी असणाऱ्या कोव्हिड-19 हॉस्पिटलला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबई (Mumbai Covid-19 Hospital Fire) येथील कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याची बातमी वेगाने पसरली असून या भीषण आगीचे व्हिडीओ (Fire at Bhandup Video) देखील समोर येत आहेत. दरम्यान या आगीत दोन मृतदेह सापडले आहेत. हॉस्पिटलकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या रुग्णांचा मृत्यू कोव्हिडमुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होत नाही आहे. या रुग्णालयात 76 रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य करून रुग्णांना मुलुंड याठिकाणी असणाऱ्या कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. यावेळी काही स्थानिक, रुग्णालयातील स्टाफ यांनी देखील बचावकार्यात मदत केली.
दरम्यान या आगीचे समोर आलेले व्हिडीओ थरकाप उडवणारे आहेत. भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये (Bhandup Dream Mall Fire) तिसऱ्या मजल्यावर स्थित सनराइझ कोविड रुग्णालयात भीषण आग लागली. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचललं मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यामुळे या आगीत होरपळून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: Fire breaks out at a hospital in Mumbai's Bhandup; rescue operation on
— ANI (@ANI) March 25, 2021
"Cause of fire is yet to be ascertained. I've seen a hospital at mall for the first time. Action to be taken. 70 patients including COVID infected shifted to another hospital," says Mumbai Mayor pic.twitter.com/sq1K29PVhe
दरम्यान घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील दाखल झाल्या होत्या. ‘मी मॉलमध्ये अशाप्रकारे हॉस्पिटल पहिल्यांदा पाहिलं. योग्य कारवाई केली जाईल’, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. दरम्यान असा सवाल उपस्थित राहतो आहे, अशाप्रकारे मॉलमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलला कोव्हिड सेंटरसाठी परवानगी कशी दिली गेली? रुग्णांना मुलुंड याठिकाणच्या कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अद्यापही याठिकाणी आग दिसत (सकाळी 7.50 वाजता) आहे.