भोपाळ, 17 जुलै : मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) विदिशा (Vidisha) इथे गुरुवारी (15 जुलै 2021) अनोखा विवाहसोहळा पार पडला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Chief Minister Shivraj Singh) यांनी दत्तक घेतलेल्या तीन मुली या सोगळ्यात विवाहबद्ध झाल्या. आपल्या मुली सासरला जाताना त्यांना निरोप देताना खुद्द मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय भावुक झाले होते.
दैनिक भास्करने या विवाहसोहळ्याचं वृत्त दिलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह आणि त्यांच्या पत्नी साधनासिंह यांच्या प्रीती, राधा आणि सुमन या तीन दत्तक मुलींचा विवाह (Adopted Daughters Marriage) गुरुवारी थाटामाटात पार पडला. आपल्या मुलींना भेटण्यासाठी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. त्यांची पत्नी साधनासिंह मुलींच्या विवाहाच्या तयारीत व्यग्र होत्या.
शिवराजसिंह 1998मध्ये विदिशाचे खासदार (MP) होते. त्या वेळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना ग्रामस्थांकडून त्यांना या मुलींबद्दल समजलं. तेव्हा त्या केवळ दोन-अडीच वर्षांच्या होत्या. शिवराजसिंह यांनी त्या मुलींचं पालकत्व स्वीकारलं आणि ते त्या मुलींना आपल्या सुंदर सेवाश्रमात घेऊन आले होते. तिथेच त्यांचं संगोपन करण्यात आलं.
ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू; देशातलं पहिलं Grain ATM सुरू
साधनासिंह यांनी या मुलींच्या आयुष्याची कहाणी सांगितली. 'या 3 मुलींपैकी प्रीती आणि सुमन या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांचं वय आता 22 ते 23 वर्षांदरम्यान आहे. या मुली खजुरी गावात बेवारस अवस्थेत आढळून आल्या होत्या. तसंच राधादेखील सिहोरच्या बुधनी तालुक्यातल्या खोवा नावाच्या गावात बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यानंतर या तिघींच्या पालनपोषणाची जबाबदारी आम्ही घेतली. यासाठी त्यांना मुखर्जीनगरच्या श्री सुंदर सेवाश्रमात ठेवण्यात आलं. त्यांच्या शिक्षणापासून ते विवाहापर्यंतची सर्व जबाबदारी या आश्रमाने स्वीकारली होती आणि ती व्यवस्थितपणे पारही पाडली,' असं त्यांनी सांगितलं.
शिवराजसिंह आणि साधनासिंह यांनी त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या विदिशातल्या गणेश मंदिरात आपल्या मुलींचं कन्यादान केलं. सिंह दाम्पत्याने विवाहाचे सर्व विधी यथासांग केले. विवाहसोहळ्याला शिवराजसिंह यांचे दोन्ही पुत्रही उपस्थित होते. या मुली सासरी जाताना शिवराजसिंह आणि त्यांचे कुटुंबीय भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. विवाहसोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवराजसिंह बुधवारी रात्रीच विदिशात दाखल झाले होते. विवाह सोहळ्यापूर्वी बुधवारी रात्री मातापूजन आणि मेंदी कार्यक्रम आदी सोहळे पार पडले. 'ही जबाबदारी कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कारण या मुली आहेत आणि आई त्यांना कधीच सोडू शकत नाही.' असे उद्गार साधना सिंह यांनी काढले.
Muslim Dating Apps : डेटिंग अॅप्सला भारतीय मुस्लिमांचा कसा मिळतो प्रतिसाद?
तिन्ही मुलींचे विवाह सरकारी कर्मचाऱ्यांशी झाले आहेत. प्रीतीचा विवाह रोहन यांच्याशी, राधाचा विवाह सोनूशी, तर सुमनचा विवाह प्रशांतशी झाला. त्यापैकी रोहन आणि सोनू नगरपालिकेत नोकरीला आहेत, तर प्रशांत निवडणूक शाखेत कर्मचारी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.