नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं. जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा, त्यांना अडकवायचं, त्यांच्या विरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं. पण ते भ्रमात आहेत. आमच्या सारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासोबतच भाजप नेत्यांना संजय राऊत यांनी थेट इशारा सुद्धा यावेळी दिला आहे. …तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एखादा माणूस उठतो आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते. मी मागे सुद्धा बोललो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही असं संजय राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनल्या सध्या ईडी आणि इतर यंत्रणा या भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटच्या एक भाग बनल्या आहेत. आजचं हे लेटर आहे ना तो ट्रेलर सुद्धा नाहीये. आजचं पत्र हे मी केवळ माहितीसाठी लिहिलं आहे. हा ट्रेलर सुद्धा नाहीये, ट्रेलर यायचा आहे. हे कशाप्रकारे ईडीचे लोकांचं काम सुरू आहे, यांचेच कशाप्रकारे आर्थिक घोटाळे आहेत, यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग सुरू आहे, हे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे गोळा करतात, यांचे वसूली एजंट आहेत. लवकरच ईडीला बेनकाब करणार. हे ठाकरे सरकारला, शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत असंही संजय राऊत म्हणाले. वाचा : “आजचं पत्र हे केवळ माहितीसाठी; ट्रेलर अजून बाकी आहे, लवकरच सर्वांना बेनकाब करणार” आतापर्यंत राष्ट्रीय एकात्मता आणि देश म्हणून गप्प बसलो आहोत. मी इतकंच सांगतो की, ही सुरुवात आहे. पवार कुटुंबाकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले. त्यांचं म्हणणं होतं की, या नेत्याचं नाव घ्या आणि त्या नेत्याचं नाव घ्या तर आम्ही येथून जातो. हे पवारांच्या बाबतीत घडलं आहे असंही संजय राऊत म्हणाले. आमच्या पाठोपाठ तुम्हालाही कोठडीत यावं लागेल हे भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत ना, की अनिल देशमुख यांच्या बाजुच्या कोठडीत तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही जाऊ पण लक्षात घ्या आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालाही यावं लागेल कारण तुमची पाप जास्त आहेत, आम्ही शुद्ध आहोत. आम्ही घाबरत नाहीत तुम्हाला असंही राऊत म्हणाले. लवकरच ईडीला बेनकाब करणार राऊत पुढे म्हणाले, सरकार पाडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अनेक नेते जाहीरपणे धमक्या देत आहेत की सरकार आता पाडू. मी आता जास्त बोलत नाही. ईडीला ज्या कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीरपणे करत रहावं. पण एक गोष्ट सांगतो तुमचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. ईडीच्या कारवाया काय चालल्या आहेत, याचा सूत्रधार कोण आहे हे मी आता लवकरच तुम्हाला सांगेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.