नवी दिल्ली, 29 मार्च : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत काम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी दिल्लीत देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठकही झाली होती. त्याच दरम्यान आज राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीए अध्यक्ष (UPA President) करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली येथे राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. स्वत: शरद पवार हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला आहे. शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच भाजपला रोखता येईल असं या बैठकीत म्हटलं आहे. वाचा : पुण्यातील कात्रज परिसरात 20 गॅस सिलेंडरचे स्फोट, भीषणता दाखवणारा VIDEO आला समोर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष रविकांत वर्पे उपस्थित आहेत. आता यूपीए अध्यक्ष बनवण्याच्या संदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर स्वत: शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना यूपीएत सहभागी होणार? शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत देखील हजर होते, अशी माहिती समोर आली होती. त्यावेळी संजय राऊत आणि सोनिया गांधी यांच्यात युपीएत सामील होण्याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीनंतर आता शिवसेना यूपीएत दाखल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात ज्याप्रकारे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याचप्रमाणे केंद्रात यूपीएचं सरकार स्थापन व्हावं यासाठी या जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचसाठी यूपीएला ताकद देण्याचं काम शिवेसेनेच्या माध्यमातून होणार असल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.