विशाल रेवडेकर, प्रतिनिधी पणजी, 2 जानेवारी : काही दिवसांपूर्वी मुंबई येथून गोव्याच्या दिशेला निघालेल्या एका क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. या क्रूजमध्ये बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या मित्रांसह गोव्याला जात होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे ड्रग्ज आढळल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी आर्यन खानसह त्याच्या इतर मित्रांना अटक देखील करण्यात आली होती. विशेष म्हणजे मुंबईहून गोव्याच्या दिशेला निघालेली कॉर्डेलिया क्रूजदेखील त्यावेळी चर्चेला कारण ठरली होती. कारण त्याच क्रूजमधून आर्यन खानला अटक झाली होती. ही क्रुज आता पुन्हा अडचणीत आली आहे. कारण नववर्षाच्या निमित्ताने मुंबईहून गोव्याला निघालेल्या या क्रुजमधील अनेक प्रवाशांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. या क्रूजमध्ये 2000 प्रवशांनी खचाखच गर्दी भरलेली होती, अशी देखील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कॉर्डेलिया क्रूज ही काही दिवसांपूर्वी मुंबईहून गोव्याच्या दिशेला निघाली होती. या क्रूजमध्ये नववर्षनिमित्ताने सेलिब्रेशन करणारे 2 हजार प्रवासी प्रवास करत होते. क्रूजमध्ये हायप्रोफाईल सुविधा आहे. या क्रूजमध्ये पार्टीपासून अनेक मजामस्ती केली जाते. पण ही क्रूज जेव्हा गोव्यात पोहोचली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. क्रूजमधील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी अनेकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहेत. गोवा सरकारने सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी होत नाही तोपर्यंत क्रूजला डॉक करण्यास परवानगी नाकारलेली आहे. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही चौकशी केली असता संबंधित क्रूज ही 15 दिवसांपूर्वी गोव्याच्या किनाऱ्यावर आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या घटनेबाबत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी बातचित केली असता त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. त्यानंतरपासून त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. हेही वाचा : मुंबई-दिल्लीहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या फ्लाईट्सवर निर्बंध, आठवड्यातून फक्त दोन दिवसांसाठी परवानगी कॉर्डेलिया क्रूजमध्ये अनेक सुविधा कॉर्डेलिया क्रूजमध्ये प्रचंड हायप्रोफाईल सुविधा आहेत. या क्रूजमध्ये रेस्टॉरंट, बार, स्विमिंग पूल, ओपन सिनेमा, थिएटर सारख्या भारी-भारी सुविधा आहेत. क्रूजमध्ये किड्स एरिया देखील आहे. तसेच मुलांच्या मनोरंजानासाठी देखील अनेक गोष्टी आहेत. तसेच या क्रूजदरम्यान प्रवास करताना वैद्यकीय साहायता लागल्यास त्याची देखील सुविधा करण्यात आलेली आहे. आयआरसीटीसीच्या मदतीने देशात 18 सप्टेंबरला या क्रूज लायनरची सुरुवात झाली होती. या क्रूजचं तिकीट हे 17 हजार 700 रुपयांपासून सुरु होतं. अनेक धनाड्ये, त्यांचे तरुण मुलं या क्रूजचा आस्वाद घेतात. पण क्रूजमध्ये नियम पाळले गेले पाहिजेत. कोरोनाचं संकट असताना नव्या वर्षानिमित्ताने लागू केलेल्या नियमांचं पूरेपर पालन होणे आवश्यक आहे. अन्यथा हे संकट वाढत जाईल. त्यामुळे काळजी घेणं जरुरीचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.