मराठी बातम्या /बातम्या /देश /

जयललिता यांच्या मृत्यूला शशिकला जबाबदार; चौकशी आयोगाचा अहवाल सादर

जयललिता यांच्या मृत्यूला शशिकला जबाबदार; चौकशी आयोगाचा अहवाल सादर

जयललिता

जयललिता

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके दिवंगत नेत्या जे. जयललिता यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या चौकशीची मागणी केली होती. असं असलं तरीही त्यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप उकललेलं नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके दिवंगत नेत्या जे. जयललिता यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या चौकशीची मागणी केली होती. असं असलं तरीही त्यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप उकललेलं नाही. याबाबत अनेक अहवाल आले आहेत. त्यामध्ये विविध गोष्टी सांगितल्या जात आहेत, मात्र अजूनही ठोस कारण समोर आलेलं नाही. न्यायमूर्ती ए. अरुमुगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करत होता. या आयोगाचा अहवाल मंगळवारी (18 ऑक्टोबर) तमिळनाडू विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. न्यायमूर्ती अरुमुगास्वामी आयोगाच्या अहवालात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 150 साक्षीदारांच्या आधारे तयार 475 पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जयललिता यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्या रुग्णालयातील 10 खोल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईक शशिकला यांच्या ताब्यात असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही जयललिता यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, असंही समोर आलं आहे. टीव्ही 9 भारत वर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

शशिकला यांच्यावर आरोप

2016 मध्ये तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युची चौकशी करणार्‍या आयोगानं जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांना दोषी ठरवलं आहे. चौकशी आयोगाच्या अहवालात डॉक्टर के. एस. शिवकुमार (शशिकला यांचे नातेवाईक), तत्कालीन आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन, माजी आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. चौकशीचे आदेश दिल्यास तेही दोषी आढळतील, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर कारवाई सुरू करणार असल्याचं सरकारनं मंगळवारी सांगितलं.

हेही वाचा - प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवल्याने Dengue रुग्णाचा मृत्यू; आता रुग्णालयावर मोठी कारवाई

शस्त्रक्रियेची टाळाटाळ

न्यायमूर्ती ए. अरुमुगास्वामी यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात, अनेक पैलूंचा विचार करून शशिकला यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. शशिकला यांच्या चौकशीची शिफारसही करण्यात आली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना 22 सप्टेंबर 2016 रोजी चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुमारे 75 दिवस त्या रुग्णालयात होत्या. 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांच्या मृत्यूची बातमी जाहीर करण्यात आली होती. जयललिता यांच्या मृत्युप्रकरणी त्यांची भाची दीपा आणि भाचा दीपक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. एआयएडीएमकेच्या अनेक नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले होते.

डॉ.वाय.व्ही.सी. रेड्डी आणि डॉ. बाबू अब्राहम यांनी जयललिता यांच्यावर उपचार केले होते. परदेशातूनही डॉक्टरांना बोलावण्यात आलं होतं. या डॉक्टरांनी जयललिता यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, भारतीय डॉक्टरांनी कुणाच्या तरी दबावाखाली येऊन शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याचंही अहवालात नमूद केलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मृत्युच्या तारखेचा गोंधळ

जयललिता यांच्या मृत्यूचा खरा दिवस कोणता आहे, यावरून वाद सुरू आहे. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, जयललिता यांचा मृत्यू 4 डिसेंबर 2016 रोजी झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुमुगास्वामी चौकशी आयोग स्थापन करण्यात आला होता. आयोगाने आपल्या 475 पानांच्या अहवालात एका तमिळ मासिकातील रिपोर्टच्या आधारे शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांनी जयललितांविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला आहे.

आयोगानं म्हटलं आहे की, जयललिता यांना काही संशय आल्याने त्यांनी शशिकला यांना त्यांच्या पोएस गार्डन निवासस्थानातून नोव्हेंबर 2011 ते मार्च 2012 पर्यंत बाहेर काढलं होतं. ही गोष्ट जगजाहीर आहे. जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा जवळची मैत्रिणी म्हणून केवळ शशिकला यांना रुग्णालयात जाण्याची परवानगी होती. डॉक्टर त्यांनाच जयललिता यांच्या प्रकृतीची माहिती देत असत. शशिकला यांच्या सूचनेनुसारच जयललिता यांच्यावर उपचार सुरू होते.

First published:

Tags: Jaylalitha, Tamil nadu