लखनऊ 21 ऑक्टोबर : सध्या अनेक ठिकाणी डेंग्यूचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. निदान लवकर झाल्यास व वेळीच उपचार मिळाल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. डेंग्यूच्या आजारात येणाऱ्या तापामुळे शरीरातलं प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होत जातं. अशा वेळी रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात. प्रयागराजमध्ये डेंग्यूच्या एका रुग्णाच्या शरीरात प्लेटलेट्स कमी झाल्यानं त्याला बाहेरून ते देण्याची गरज होती; पण खासगी रुग्णालयात त्याला प्लेटलेट्सऐवजी चक्क मोसंबी ज्यूस देण्यात आला व प्रकृती अत्यवस्थ होऊन त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोग्य विभागानं तत्काळ कारवाई करून हॉस्पिटलचा परवानाच रद्द केला. हॉस्पिटल सील करण्याचे आदेश सीएमओ म्हणजेच मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. Shocking! मोसंबी ज्युसमुळे Dengue रुग्णाचा मृत्यू; नेमकं काय झालं पाहा VIDEO प्रदीप पांडेय यांना डेंग्यूचं निदान झाल्यानंतर 17 ऑक्टोबरला झलवा इथल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना 8 युनिट प्लेटलेट्स चढवण्याचा सल्ला दिला. त्यातलं तीन युनिट प्लेटलेट्स चढवलंही गेलं. त्यानंतर हॉस्पिटलने पाच युनिटची मागणी केली. नातेवाईकांनी एजंटच्या माध्यमातून प्लेटलेट्स आणून दिले; पण ते चढवल्यानंतर रुग्णाची प्रकृती आणखीच बिघडली. त्यांना हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. तिथे 19 ऑक्टोबरला रुग्णाचा मृत्यू झाला. सीएमओ डॉ. नानक सरन यांनी तेजबहादूर सप्रू बेली हॉस्पिटलमधल्या ब्लड बँकेच्या तीन सदस्यीय डॉक्टरांची टीम बनवली व प्रकरणाचा तपास केला. सीएमओ डॉ. नानक सरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हॉस्पिटलचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. त्यानंतर ग्लोबल हॉस्पिटलचा परवाना रद्द करून ते सील करण्याची कारवाई केली गेली. सीएमओच्या आदेशानुसार, डॉ. ए.के. तिवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणावर उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री ब्रजेश पाठक व आरोग्य मंत्र्यांनी ट्विट केलं आहे. प्रयागराजचे पोलीस महानिरीक्षक डॉ. राकेश कुमार सिंह यांनीही कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. VIDEO - रस्त्यात समोर होता मृत्यू! यमराजाआधी देवदूत बनून आला पोलीस; वाचवला शेतकऱ्याचा जीव सीएमओ म्हणाले, दोषींवर कडक कारवाई करणार सीएमओंनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांकडे एक युनिट प्लेटलेट्स शिल्लक राहिलं. ते सुरक्षित ठेवण्यात आलं असून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आलं. त्या युनिटवर एसआरएन हॉस्पिटलचा शिक्का असून प्लेटलेट्स बनावट तर नाहीत ना याचा तपासही केला जाईल. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींची कदापि गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सीएमओंनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमध्ये काही दिवसांपूर्वीच बनावट रक्त विकणाऱ्या टोळीला जॉर्जटाउन पोलिसांनी पकडलं होतं. कारमध्ये ब्लड बँक चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाशही करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी अनेक युनिट्स बनावट रक्तही जप्त केलं होतं. शिवाय 12 आरोपींना गजाआड केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.