डेहराडून, 19 मार्च: काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडचे (Uttarakhand cm tirath singh rawat) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले भाजपचे नेते तीरथसिंह रावत यांचं नाव अचानक देशभर चर्चेत आलं ते फाटक्या जीन्सबद्दल (Ripped Jeans) केलेल्या वक्तव्यामुळे. स्त्रिया अशा टॉर्न्ड जीन्स घालतात त्यावर त्यांनी टीका केली होती आणि त्यावरून देशभरात चर्चा सुरू झाली होती. आपल्या पतीची बाजू सावरून घ्यायला मग मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी रावत यांनी धाव घेतली. याच रश्मी रावत एकेकाळी सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभागी झाल्या होत्या.
'फाटक्या जीन्स परिधान करणं हे पालकांनी मुलांपुढे ठेवलेलं वाईट उदाहरण आहे. 'पाश्चिमात्य जग आपली योगाची परंपरा अंगीकारायला लागलं आहे, अंगभर कपडे घालायला लागलं आहे आणि भारतीय मात्र दिवसेंदिवस नग्नतेकडे चालले आहेत,' अशी टीका रावत यांनी केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली जात आहे. तीरथसिंह मोकळ्या विचारांचे असून, माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याची मोडतोड करून ते सादर केलं, अशी प्रतिक्रिया रावत यांच्या पत्नी रश्मी यांनी व्यक्त केली. त्या स्वतः कॉलेजच्या दिवसांत असताना त्यांनी 'मिस मेरठ'चा किताब पटकावला होता. या पार्श्वभूमीवर दैनिक भास्करने तीरथसिंह रावत यांच्या वैयक्तिक आणि राजकीय वाटचालीवर नजर टाकणारं वृत्त दिलं आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी तीरथसिंह रावत (Tirath Singh Rawat) यांचं नाव अजिबात चर्चेत नव्हतं; मात्र भाजपच्या (BJP) बैठकीत जेव्हा त्यांचं नाव अचानक पुढे आलं, तेव्हा राजकीय विश्लेषकांनीही भुवया उंचावल्या. त्यानंतर लगेचच त्यांचा शपथविधीही झाला. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांत त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभर त्यांच्या नावाची चर्चा झाली. ते भारतीय जनता पक्षाचे अत्यंत संयमी आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
तीरथ सिंह यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'जीन्स वापरण्याला विरोध नाही पण...'
नऊ एप्रिल 1964 रोजी पौडीमधल्या सीरो गावात कलमसिंह रावत आणि गौरा देवी यांच्या पोटी तीरथसिंह यांचा जन्म झाला. भावांमध्ये सर्वांत लहान असलेले तीरथ किशोरवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. जहरीखाल या आपल्या भागात शाखा लावता लावता ते विसाव्या वर्षीच संघाचे प्रांत प्रचारक (RSS) बनले. 1983 ते 1988 यादरम्यान संघाचे प्रचारक म्हणून काम केल्यानंतर त्यांना भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) पाठवण्यात आलं.
त्यांनी समाजशास्त्रात बीए केलं आहे. 1992मध्ये गढवालमधल्या हेमवती नंदन बहुगुणा विश्वविद्यालयात ते विद्यार्थी संघाचे अध्यक्षही होते. त्यानंतर ते 'अभाविप'चे प्रदेश उपाध्यक्ष बनले आणि संसदीय राजकारणाच्या दिशेने त्यांची पावलं पडू लागली. त्या काळात ते राम मंदिर मुद्द्यासह उत्तराखंड आंदोलनातही सक्रियपणे सहभागी होते. राम मंदिर आंदोलनादरम्यान त्यांना दोन महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता.
विद्यार्थिदशेतल्या राजकारणातून संसदीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर तीरथसिंह यांनी भुवनचंद्र खांडुरी (B. C. Khanduri) यांना गुरू मानलं. खंडुरी त्या वेळी पौडी-गढवाल मतदारसंघातून निवडणूक लढवायचे आणि तीरथसिंह त्यांचे प्रचारप्रमुख असायचे. त्यांच्या कार्याचं बक्षीसही त्यांना मिळालं. 1997मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये खंडुरी मंत्री होते. त्या वेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत तीरथ यांना पाठवण्यासाठी जोर लावला. त्यामुळे 1997मध्ये तीरथसिंह विधानपरिषदेचे आमदार झाले. 2000 साली उत्तराखंड जेव्हा स्वतंत्र राज्य झालं, तेव्हा खंडुरी मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात तीरथ राज्याचे पहिले शिक्षणमंत्री बनले.
'OMG यांचे गुडघे दिसतायंत..', प्रियांका गांधींनी का पोस्ट केला मोदींचा हा PHOTO?
हळूहळू तीरथसिंह आपला प्रभाव वाढवत होते. 2012च्या विधानसभा निवडणुकीत खंडुरींसह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला, त्या वेळीही तीरथसिंह विजयी झाले होते. 2013मध्ये तीरथसिंह यांना उत्तराखंड भाजपचं प्रमुखपद देण्यात आलं. 2015मध्ये त्यांच्याकडून ते पद काढून घेण्यात आलं.
चौबट्टाखाल विधानसभा मतदारसंघात ते विद्यमान आमदार असल्याने 2017मध्ये त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. कारण त्या वेळी उत्तराखंडमधले दिग्गज म्हणून ओळखले जाणारे नेते सत्पाल महाराज भाजपमध्ये आले होते आणि त्या मतदारसंघावर त्यांनी दावा केला होता.
'2017मध्ये जेव्हा त्यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं, तेव्हा कुटुंबाला खूप वाईट वाटलं होतं; मात्र तीरथजी धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे आहेत. ते काहीही बोलले नाहीत. पण त्यांच्या क्षमतेमुळेच ते दोन वर्षांनी लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकलेही,' असं त्यांच्या पत्नी रश्मी म्हणाल्या.
2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचे गुरू भुवनचंद्र खंडुरी यांचे पुत्र मनीष खंडुरी (Manish Khanduri) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याविरोधात पौडी गढवाल मतदारसंघातून तीरथसिंह यांनी निवडणूक लढवली. त्यात तब्बल 2 लाख 85 हजार मतांनी तीरथ यांचा विजय झाला.
2017मध्ये त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं; पण आता 2021मध्ये राज्याचं मुख्यमंत्रिपद देऊन साऱ्या राज्याची धुराच त्यांच्या हाती देण्यात आली आहे.
साधी राहणी
तीरथ यांच्या पत्नी रश्मी डेहराडूनच्या डीएव्ही कॉलेजमध्ये मानसशास्त्राच्या शिक्षिका आहेत. त्या सांगतात, 'भुवनचंद्र खंडुरी आणि अटलजी यांना माझे पती आदर्श मानतात. त्यांना साधी राहणी आवडते. ते कधी दिखाऊ गोष्टी करत नाहीत आणि पैशांच्या मागे लागत नाहीत. ते शिक्षणमंत्री होते, तेव्हाही मी माझी पाच हजारांची नोकरी करतच होते.
Ripped Jeans मधला फोटो पोस्ट करत शिवसेना महिला खासदाराची या CM वर टीका
तीरथजींचं करिअर राजकीय क्षेत्रात आहे. त्यामुळे आयुष्यात चढ-उतार कायम राहणार. या विचाराने मी नोकरी करत राहिले.'
लग्नाचा किस्सा
तीरथ यांची सासुरवाडी उत्तर प्रदेशातल्या मेरठ शहरात आहे. त्यांच्या लग्नाचा किस्साही मजेदार आहे. रश्मीही 'अभाविप'शी संबंधित होत्या. तीरथसिंह यांनी त्यांना गाझियाबादमध्ये एका वाद-विवाद स्पर्धेत पाहिलं. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत मोठ्या पदावर होते. त्यानंतर तीरथ यांनी कोणामार्फत तरी रश्मी यांच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. परंतु, रश्मी यांच्या घरच्यांनी तो प्रस्ताव नाकारला. कारण त्यांना राजकीय क्षेत्रातल्या घरात आपली मुलगी द्यायची नव्हती. अनेक दिवस ती गोष्ट तशीच राहिली. 1997मध्ये तीरथसिंह विधान परिषदेचे आमदार बनले. त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा रश्मी यांच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. त्या वेळी मात्र त्यांच्याकडून प्रस्ताव स्वीकारला गेला. 1998मध्ये रश्मी आणि तीरथ यांचा विवाह झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tirath singh rawat, Uttarakhand