कोविड योद्धा मोहम्मद आरिफ यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती भवनाकडून 2 लाखांची मदत

कोविड योद्धा मोहम्मद आरिफ यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती भवनाकडून 2 लाखांची मदत

कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी आपला जीव धोक्यात घालून तब्बल 200 रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाशी सामना करत असताना दिल्लीतील मोहम्मद आरिफ यांनी 200 जणांना वेळेवर रुग्णालयात पोहोचून प्राण वाचवले होते. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे मोहम्मद आरिफ यांचे दुर्दैवी निधन झाले. राष्ट्रपती भवनाकडून  आरिफ यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत करण्यात आली आहे.

मोहम्मद आरिफ हे  25 वर्षांपासून  शहीद भगत सिंह सेवा दलात कार्यरत होते. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी आपला जीव धोक्यात घालून तब्बल 200 रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले होते. एवढंच नाहीतर मोहम्मद आरिफ यांनी 100 हुन अधिक कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले होते.

परंतु, कोरोनाशी लढणाऱ्या या योद्ध्याला कोरोनाने गाठले होते. 11 ऑक्टोबर रोजी मोहम्मद आरिफ यांनी कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केले होते. पण, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना तातडीने हिंदूराव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहम्मद आरिफ यांचे निधन झाले होते.

मोहम्मद आरिफ यांच्या निधनामुळे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून राष्ट्रपती भवनाकडून छोटीशी मदत देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या अधिकाऱ्यांनी आरिफ यांच्या घरी जावून कुटुंबीयांकडे दोन लाखांचा चेक स्वाधीन केला आहे.

शहीद भगत सिंह सेवा ट्रस्टचे संस्थापक जितेंद्र शंटी यांनी सांगितले की, 'मोहम्मद आरिफ शहीद भगत सिंह सेवा दलाच्या रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून काम पाहत होते.  आरिफ हे कोरोनाबाधित रुग्णांना मोफत रुग्णालयात दाखल करण्याचे काम करत होते. आरिफ हे 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी हजर होते. कोरोनाच्या काळात त्यांनी या कामासाठी वाहून घेतले होते. आपल्यामुळे कुटुंबीयांना कोरोनाची लागण होईल म्हणून त्यांनी घरी जाणेही बंद केले होते. तब्बल 200 कोरोनाबाधितांना आरिफ यांनी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मुस्लिम असून त्यांनी कोरोनामुळे निधन झालेल्या 100 हिंदू व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले होते.'

आरिफ हे आपल्या कुटुंबात कमवणारे एकमेव व्यक्ती होते. त्यांचे कुटुंब  वेलकम एल ब्लॉक लोहा मंडी परिसरात भाड्याच्या घरात राहत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2मुलं आणि 2 मुली असा परिवार आहे.

Published by: sachin Salve
First published: October 17, 2020, 2:02 PM IST

ताज्या बातम्या