मुंबई/दिल्ली, 9 मार्च : येस बँक (Yes Bank) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबईतील अनेक डीएचएफएल (DHFL) ठिकाणी छापे टाकले आहेत. सीएनएन न्यूज 18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने किमान सात ठिकाणी छापे टाकले असून यातील बहुतांश ठिकाणे मुंबईतील आहेत.
सेनापती बापट मार्ग लोअर परेल येथील वन इंडियाबूल्स सेंटरमधील 7 व्या आणि 8 व्या मजल्यावर, विंग A मधील टॉवर 2 येथील 15 व्या मजल्यावर याशिवाय वरळी डॉ. ए.बी. रोड नेहरु सेंटर येथील 8 व्या व 9 व्या मजल्यावर छापे मारण्यात आले आहे.
संबंधित - राणा कपूरला दुसरा झटका, ED नंतर आता CBI नेही दाखल केला गुन्हा
सीबीआय डीएचएफएलचे अध्यक्ष कपिल वाधवन यांची तपासणी करण्यास तयार आहे. येस बँकेचे सह संस्थापक राणा कपूर यांना लाच दिल्याचा आरोप कपिल यांच्यावर आहे.
कपूर यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या फॅमिली कंपनीला कर्ज म्हणून लाच देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सीबीआय नवी दिल्लीच्या EO I युनिटने चौकशी सुरू केली आहे. डीएचएफएलच्या (DHFL) कर्मचार्यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कपिलने 600 कोटी रुपयांचे कर्ज देऊनही कपूरच्या कुटूंबाशी कोणी संपर्क साधू नये याची काळजी घेतली. दुसरीकडे तारण दिलेल्या मालमत्तेचे वास्तविक मूल्य केवळ 40 कोटी रुपये इतके होते.
संबंधित - येस बॅंक घोटाळा : राणा कपूर आणि प्रियंका गांधींचं कनेक्शन असल्याची शक्यता
सूत्रांचे म्हणणे आहे की, कपिल यांना समन्स बजावून चौकशीत सहभागी होण्यास सांगितले जाईल. कपिलशिवाय धीरज दीवान (partner in RKW Developers) यांनाही समन्स बजावले जाईल. एफआयआरमध्ये नाव नसले तरी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 2016-17 मध्ये 750 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते.
छापे संपल्यानंतर पत्रकारांना माहिती देतील, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) च्या आर्थिक गुन्हे शाखेने 7 मार्च रोजी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, दोहित अर्बन व्हेंचर्स (राणा कपूर कुटुंबाशी संबंधित कंपनी), कपिल वधावन (देवास हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे अध्यक्ष) आणि इतरांवर भ्रष्टाचार या गुन्ह्याअंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला होता.