गुवाहाटी, 14 फेब्रुवारी : आसाममध्ये (Assam) काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. आसाममध्ये बेकायदेशीर नागरिकांचा मुद्दा हा प्रमुख विषय आहे. कोरोना लसीकरण संपताच देशात CAA लागू करणार अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) नुकतीच केली होती. त्याला राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. ( वाचा : कोरोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाहांची घोषणा ) काय म्हणाले राहुल गांधी? आसाममधील लोकं हे देशाच्या पुष्पगुच्छातील फुल आहेत. आसामला काही झालं तर देशाचं नुकसान होईल. काहीही झालं तरी देशात CAA लागू होणार नाही,’’ असं सांगत त्यांनी एकप्रकारे केंद्र सरकारला आव्हानच दिलं आहे. आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची राहुल गांधींनी जोरदार प्रशंसा केली.
“आसाममध्ये जे लोकं द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत, त्यांना जनता आणि काँग्रेस मिळून धडा शिकवेल. काँग्रेस नेहमीच छोटे व्यापारी आणि दुर्बल लोकांचा पक्ष आहे. आमचं सरकार सत्तेवर आल्यावर सध्या जो द्वेष पसरवला जात आहे, तो नष्ट होईल. आम्ही सर्व धर्माच्या आणि जातींच्या लोकांचं रक्षण करु,’’ असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, “2004 ते 2014 या कालावधीमध्ये देशाचा आर्थिक विकास झपाट्यानं झाला. आम्ही कोट्यावधी नागरिकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं. आम्ही आसाममधील बेरोजगारी नाहीशी करू. आता रिमोटच्या सरकारपासून आसामची मुक्ती होण्याची वेळ आली आहे. रिमोटनं टेलिव्हिजन चालू शकतो, सरकार नाही. तुमचा मुख्यमंत्री हा आसामचाच असला पाहिजे.’’